
कणकवली : अवैध धंदे रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून विशेष पथक नेमण्यात आले आहे . या पथकाकडून शुक्रवार, 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.50 वाजण्याच्या सुमारास ओसरगाव येथे छापा टाकू ५० हजार रुपये किमतीची गोवा बनावटी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी नागेश आनंद चव्हाण (45, रा. ओसरगाव - पटेलवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागेश चव्हाण अवैध दारूविक्री करत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने नागेश चव्हाण याच्या घरी छापा टाकला असता नागेश हा काही पिशव्या घेऊन गेटजवळ उभी असलेली दिसून आला. पथकाने पिशव्यांची पहाणी केली असता त्यामध्ये विविध कंपनीच्या गोवा बनावटी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. त्यानुसार पोलिसांनी त्या पिशव्यांमधील 49 हजार 800 रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पीएसआय आर. बी. शेळके, ए. एस. आय. देवानंद माने, महिला कॉन्स्टेबल दर्शना पालकर यांच्या पथकाने केली. देवानंद माने यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












