जिल्हा बँक माजी उपाध्यक्ष सुरेश दळवींना मनीष दळवींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

दोन्ही दळवींच्या सदिच्छा भेटीने राजकीय व सहकार क्षेत्रात चर्चाना उधाण
Edited by: संदीप देसाई
Published on: December 06, 2025 21:39 PM
views 153  views

दोडामार्ग : सहकार क्षेत्रात विशेष कामगिरी करून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष सुरेश दळवी यांचा वाढदिवस शनिवारी साजरा झाला. यानिमित्ताने विद्यमान जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या भेटीदरम्यान सुरेश दळवी यांनीही मनीष दळवी यांच्या कार्याचा उल्लेख करीत, त्यांचा उत्साह, सहकार क्षेत्रासाठीचे धोरणात्मक निर्णय व संघटन कौशल्य याबद्दल अभिनंदन केले. तसेच आगामी काळातही जिल्ह्यासह सहकार क्षेत्र अधिक सबळ होण्यासाठी ते असेच जोमाने काम करत राहावेत, अशा “आशीर्वाद-रूपी शुभेच्छा” देत त्यांना प्रोत्साहन दिले.

जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीनंतर राजकीय वातावरणात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. त्यातच पुढील जि.प. व पंचायत समिती निवडणुका समीप असताना, दोन्ही दळविंची झालेली ही सदिच्छा भेट राजकीय व सहकारी वर्तुळात विशेष महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना एक वेगळी दिशा मिळू शकते, अशा चर्चानाही उधाण आले तर त्यात नवल वाटू नये.

शनिवारी (६ डिसेंबर) कोलझर येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी दोडामार्ग दौऱ्यावर होते. याच दिवशी जेष्ठ नेते सुरेश दळवी यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी भेट ठरवून त्यांचे अभिनंदन केले.

या भेटीवेळी जिल्हा बँक संचालक गणपत देसाई, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस, पराशर सावंत, तसेच सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या औपचारिक पण आपुलकीच्या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये जिल्ह्यातील सहकारक्षेत्र व विकासकार्यातील योजनांवरही थोडक्यात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.