
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत नगराध्यक्षपदासाठी शिवसेना उमेदवार ॲड. नीता सावंत-कविटकर जोमाने उतरल्या आहेत. उच्चशिक्षित आणि सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या ॲड. नीता सावंत-कविटकर यांनी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यातही आघाडी घेतली आहे. विद्यमान आमदार दीपकभाई केसरकर यांच्या पाठीशी जनता ठामपणे उभी आहे, या भरवशावर शिवसेनेच्या सर्वच्या सर्व जागा निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. विकास काय असतो, हे दीपकभाईंनी दाखवून दिले आहे. सुंदरवाडीच्या विकासाचे व्हिजन केवळ दीपकभाईंच्या कार्यकर्तृत्वातून दिसून येते, त्यामुळे यावेळी निश्चितच मतदार आम्हांला संधी देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केसरकरांच्या कामाचा वारसा आणि विकासाचे व्हिजन
नगराध्यक्षपदाची संधी मिळाल्यास काय कराल, या प्रश्नावर ॲड. सावंत-कविटकर यांनी सर्वसामान्य लोकांसाठी आपण काम करणार असल्याचे स्पष्ट केले. या निवडणुकीसाठी माझे व्हिजन तयार आहे. बारीकसारीक गोष्टीतून सुरूवात सर्वसामान्यांचे सर्वसामान्य प्रश्न सोडविण्यासाठी प्रथम मी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रस्त्याच्या कडेला टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवर उपाय म्हणून, नोकरी करणाऱ्या महिलांच्या सोयीसाठी जागोजागी कमी प्रमाणात का होईना, पण कचरा कुंड्या ठेवणे, जेणेकरून कचरा एकाच ठिकाणी जमा होईल. सावंतवाडीत भटक्या कुत्र्यांची मोठी समस्या आहे. अनियमित पाणीपुरवठा होतो, त्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी विधायक पावले उचलली जातील. महिलांच्या हाताला काम मिळण्यासाठी तसेच आरोग्याच्या दृष्टीने आणि रोजगाराभिमुख उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल, असे त्या म्हणाल्या.

विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर
सावंतवाडीत विकास झाला नसल्याच्या विरोधकांच्या टीकेला ॲड. नीता सावंत-कविटकर यांनी सडेतोड उत्तर दिले. सावंतवाडी पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने पर्यटनाच्या दृष्टीने विकसित झाली आहे. आमदार दीपकभाई केसरकर यांनी शहरासाठी मोठा निधी आणला आणि त्याचा वापरही केला आहे, असे त्यांनी सांगितले. ५७ कोटींची नळ-पाण्याची योजना, २ कोटींचे योगा सेंटर, १३ कोटींचे भाजी मार्केट, आणि अडीच कोटींचे फायर स्टेशन ही विकासाचीच उदाहरणे आहेत. "लोकांचे रस्ते चांगले पाहिजेत, आरोग्य चांगले पाहिजे, महिलांना काम मिळालेलं पाहिजे, हेच विकासाचे माध्यम आहे," असे सांगत, विरोधकांच्या म्हणण्याला काहीही अर्थ नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
‘माझ्याकडे कधीही या...’
या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि अपक्ष अशा सगळ्याच पक्षांनी तगडे उमेदवार उभे केले असताना, ॲड. नीता सावंत-कविटकर यांनी या आव्हानांकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले. त्या म्हणाल्या, "मी सर्वसामान्य कुटुंबातील आहे, उच्चशिक्षित आहे, ॲडव्होकेट आणि नोटरी आहे. माझे वडील सैनिक आणि नंतर एसटीमध्ये ड्रायव्हर होते. मी कष्टातून वर आलेली 'आउटडोअर' व्यक्ती आहे. माझ्याकडे येण्यासाठी तुम्हाला परवानगीची गरज लागणार नाही." असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला आहे.
सत्तेचे पाठबळ आणि निधीचा विश्वास
लोकांनी आपल्यालाच का निवडून द्यावे, या प्रश्नावर त्यांनी सत्तेतील पाठबळाचे महत्त्व अधोरेखित केले. "आज माझ्या पाठीमागे आमचे आमदार दीपकभाई केसरकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बळकट पाठबळ आहे," असे त्यांनी सांगितले. हे पाठबळ असल्यामुळे राज्यासाठी हवा तेवढा निधी मी मागून घेऊ शकते आणि विकासाचे काम चांगल्या प्रकारे करू शकते, हा विश्वास त्यांनी जनतेला दिला. सावंतवाडीतील २१ जागांसाठी लढत असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांसहित '२१ शून्य' च्या फरकाने २१ च्या २१ जागा आम्ही जिंकू, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सावंतवाडीकरांना कळकळीचे आवाहन
ॲड. नीता सावंत-कविटकर यांनी सावंतवाडीकरांना आवाहन केले आहे की, "सावंतवाडीकरांचे मी आताच धन्यवाद देते, कारण जेव्हा आम्ही फिरतो तेव्हा ते खूप चांगले आशीर्वाद देतात आणि म्हणतात 'तुमच्यासारखीच नगराध्यक्ष आम्हाला हवी आहे'." यापुढे सावंतवाडी स्वच्छ करण्याची आपली इच्छा असून, आपल्या प्रत्येक कार्यात नागरिकांनी सहकार्य, आशीर्वाद द्यावा आणि ठामपणे पाठीशी उभे राहावे, अशी कळकळीची विनंती त्यांनी सावंतवाडीकरांना केली आहे.










