प्रश्न मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा..

जमीन मालकांचा लेटर बॉम्ब
Edited by: विनायक गांवस
Published on: November 24, 2025 17:12 PM
views 176  views

सावंतवाडी : मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलकरीता आरक्षित भूखंड ताबडतोब विकसीत करा, अन्यथा, परत द्या अशी मागणी करणारा लेटर बॉम्ब आज जमिनमालकांनी टाकला. त्यामुळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलबाबत प्रशासनाच्या निष्क्रीयतेचा मुद्दा उघड झाला आहे. 

शासनाच्या टाऊन प्लानिंग विभागाने नोटिफिकेशन काढून 2019 मध्ये रविंद्र केरकर यांच्यासह आजूबाजूची दोन हेक्टर जागा अधिकृत्या आरक्षित केली. "आरक्षण क्र.5अ" संदर्भात जागा मालक केरकर यांनी पत्रव्यवहार केला. मात्र गेली सहा वर्षं मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल संदर्भात भूखंड विकसित करण्याबाबत कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. भूखंड शासनाने आरक्षित करुन ठेवल्याने जमिन मालकांना त्यावर अन्य काही करता येत नाही आणि शासन सुध्दा हाँस्पिटल उभारणीच्या हालचाली करत नाही. त्यामुळे वैतागून जाऊन जागा मालकांनी एक तर जागा विकसित करा अन्यथा परत द्या अशी मागणी करणारे पत्र आज सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांना पाठवले आहे.

या पत्रात ते म्हणतात, मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल व्हावे, ही जनतेची मागणी आहे. तसा भूखंड आरक्षित आहे. जागा मालक योग्य शासकीय मोबदल्याने जागा देण्यास तयार आहेत. याबाबत लवकरात-लवकर कार्यवाही व्हावी. अन्यथा ज्या उद्देशासाठी जागा आरक्षित आहे तो उद्देश सफल होत नसल्यास आमची जागा आम्हाला परत करावी.