'बंडखोरी ठरणार डोकेदुखी'

युतीनंतर आघाडीत बिघाडी !
Edited by: विनायक गांवस
Published on: November 17, 2025 19:52 PM
views 174  views

सावंतवाडी : नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची प्रंचड लगबग दिसून आली. तब्बल ६२ उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आले. महायुतीत फुट पडल्यानंतर आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली.  काँग्रेसने शक्तीप्रदर्शन करत सौ. साक्षी वंजारी यांच्या रूपाने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह एकूण 16 जागेवर उमेदवारी अर्ज दाखल केले. तर भाजपने शेवटच्याक्षणी काही इच्छुकांचे पत्ते कट करत नव्या आणि अनपेक्षित चेहऱ्यांना रिंगणात उतरवले.

दुसरीकडे काही इच्छुकांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी  दाखल केली. त्यामुळे स्वतंत्रपणे लढून देखील नेत्यांची डोकेदुखी काही कमी झालेली नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही ५ जगावर उमेदवार दिले आहेत. ऐनवेळी त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उल्का वारंग यांनी माघार घेतली. यामुळे उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी निर्माण नाट्यमय घडामोडी दिसून आल्या.सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाने रणांगणात उडी घेतली आहे, यामध्ये केवळ उबाठा शिवसेना,राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मनसे यांनी हात मिळवणी करत एकत्र उमेदवार दिलेत. मात्र, यामधून काँग्रेसने 'हात'काढत घेत स्वतंत्र उमेदवार उभे केलेत. त्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून आले. उबाठाकडूनही उर्वरित चार जागेवर शेवटच्या दिवशी उमेदवारी दाखल करण्यात आली. मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोबत घेत एकूण 21 जागेवर उमेदवारी दाखल केली आहे. तर सौ.सीमा मठकर यांच्या रूपाने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार रिंगणात उतरवला आहेत.काँग्रेसकडून सौ.साक्षी वंजारी यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज आज शक्ती प्रदर्शनाने शहरातून रॅली काढत भरला. त्यांच्यासोबत 16 जागावर उमेदवारी अर्ज भरण्यात आले.दुसरीकडे महायुतीमधील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून एकूण ५ जागेवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भारतीय जनता पार्टीने शेवटच्या दिवशी काही वेगळी रणनीती आखात इच्छुक असलेल्या आणि ऑनलाईन अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचे पत्ते कट करत नव्या चेहऱ्यांना अनपेक्षित रित्या रिंगणात उतरवले. यामध्ये प्रभाग नऊ मधून ॲड. रुजूल पाटणकर यांना उमेदवारी दिली. तर महिला उमेदवार म्हणून माजी नगरसेवक असलेल्या ॲड. परिमल नाईक यांची पत्नी सौ. नीलम नाईक यांना संधी दिली. तसेच सुकन्या टोपले यांना दुसऱ्या प्रभागात उमेदवारी दिली. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने उमेदवारी दाखल केलेल्यांना पक्षाचा एबी फॉर्म दिला. त्यामुळे काही इच्छुकांची नाराजी या ठिकाणी पाहायला मिळाली. 

भाजपामधून सुरुवातीपासून स्पर्धेत असलेल्या काहींनी अपक्ष उमेदवारी ही दाखल केली आहे. यात राधिका चितारी, अन्नपुर्णा कोरगावकर, अस्मिता परब, गौरव जाधव यांचा समावेश आहे. बंडखोरी शमविण्यासाठी भाजपला प्रयत्न करावे लागणार आहे. शिवसेनेमध्ये सुद्धा बंडखोरी झाली. इच्छुकांमधून बबलू मिशाळ, अर्चित पोकळे, लतिका सिंग यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने पक्षाच्या चिन्हावरील उमेदवारांना या ठिकाणी मोठी अडचण निर्माण झाली आहे. दोघांचीही नाराजी दूर करत उमेदवारी मागे घेण्यासाठी केसरकर यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. भाजप, शिवसेना व उबाठा शिवसेनेकडून यावेळी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. एकूणच शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करताना काहीशी गडबड उमेदवारांमध्ये पाहायला मिळाली.