
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेत सुरू करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीमुळे कामकाजात गती आली असून, कर्मचाऱ्यांचे कामाचे तास लक्षणीयरीत्या कमी झाले आहेत. या प्रणालीचा वापर अधिक प्रभावी करण्यासाठी आतापर्यंत ७२२ कर्मचाऱ्यांना एआयचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. नीती आयोगाच्या सदस्यांनी या उपक्रमाची पाहणी करून समाधान व्यक्त केले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली.
एआय प्रणालीचा उपयोग आता शेती क्षेत्रातही होणार असून, हळद लागवड आणि प्रोसेसिंग युनिट उभारणीसाठी २१ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. हळद लागवडीसाठी एआयच्या माध्यमातून मातीची माहिती, हवामानाचा अंदाज आणि उत्पादनक्षमता यांचा अभ्यास केला जाणार आहे.
दरम्यान, आरोग्य विभागाने एआय प्रणालीच्या माध्यमातून केलेल्या अभ्यासात मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही आरोग्य केंद्रांकडून या आजारांच्या औषधांची मागणी वाढली असून, ती औषधे वेळेवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
ग्रामीण भागातील रुग्णांच्या औषधांच्या मागणी व त्यावरील खर्च लक्षात घेता, ग्रामपंचायतींनी नागरिकांसाठी औषध उपलब्धतेसाठी निधी तरतूद करावी, अशा सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिल्या आहेत.










