
सावंतवाडी : 'ओंकार' हत्तीला दांड्याने मारहाण करून हाकलून लावण्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, जनतेतून वन विभागाच्या कार्यप्रणालीवर आणि संबंधितांविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे वनविभागाच्या डोळ्या देखत हा प्रकार सुरु होता.
गेले काही महिने'ओंकार' हत्ती आपल्या कळपापासून दूर भटकत आहे. गोव्यानंतर तो आता सिंधुदुर्गात स्थिरावला आहे. हत्तीने परिसरातील भातशेती आणि बागांचे मोठे नुकसान केले आहे. यातच एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, 'ओंकार' हत्तीला दांड्याने मारून हाकलले जात असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, ओंकार हत्तीला वनविभागाच्या टीम समोर दांड्याने झालेली मारहाण निंदनीय आहे. ज्या हत्तीला तिलारीखोऱ्यातील स्थानिकांनी प्रेमाने देवाचे नाव दिले, ज्याला प्रेमाने सांभाळले त्या ओंकार हत्तीला सावंतवाडी तालुक्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसमोर झालेल्या मारहाणीचा प्रकार म्हणजे अत्यंत अमानवी क्रूरतेचे प्रदर्शन आहे. हत्तींच्या संरक्षणासाठी अनेक कायदेशीर तरतुदी आहेत, WLPA च्या कलम ४३ नुसार हत्ती हा अनुसूची १ चा प्राणी आहे. वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ आणि हत्ती संरक्षण कायदा, १८७९. वन्यजीव (संरक्षण) नुसार त्यांची शिकार करण्यास सक्त मनाई आहे. हत्ती संरक्षण कायदा, १८७९ च्या कलम ९ मध्ये वन्य हत्तींना मारण्यास, जखमी करण्यास मनाई करणारी तरतूद आहे. प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० मध्ये प्राण्यांना अनावश्यक त्रास देणे हा गुन्हा मानला जातो. या कायद्यानुसार कोणत्याही प्राण्याला अनावश्यक त्रास देणे, मारहाण करणे, छळ करणे किंवा त्यांना वेदना होईल अशा कोणत्याही कृती करणे गुन्हा आहे. या नुसार सदर प्रकरणाची वनविभागाने सखोल चौकशी करून ओंकार हत्तीला अनावश्यक वेदना किंवा त्रास देणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी प्राणीमित्र तुषार देसाई यांनी केली आहे











