
सावंतवाडी : यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजच्या दोन विद्यार्थिनींना केंद्र सरकारची रिसर्च स्कॉलरशिप जाहीर झाली आहे. बी.फार्मसी अंतिम वर्षात शिकणाऱ्या पौर्णिमा महाले आणि एम.फार्मसीच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या भक्ती पालेकर या विद्यार्थिनींना अनुक्रमे तीन व सहा महिन्यांसाठी ही स्कॉलरशिप मिळाली आहे.
या अंतर्गत पौर्णिमाला तीन महिन्यांसाठी दरमहा दहा हजार, तर भक्तीला सहा महिन्यांसाठी दरमहा पंधरा हजार अशी एकूण नव्वद हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. प्रधान वैज्ञानिक सल्लागार, भारत सरकार यांच्या वतीने स्थापन झालेल्या ‘पुणे नॉलेज क्लस्टर’ या संस्थेमार्फत या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येते. या माध्यमातून नवकल्पना, संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाला चालना देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. या संशोधनासाठी विद्यार्थिनींना कॉलेजचे फार्मास्युटिक्स विभागप्रमुख डॉ.रोहन बारसे आणि प्राचार्य डॉ.विजय जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींच्या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले व संचालक मंडळाने त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.











