
सावंतवाडी : दक्षिण कोकणच पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवसाला पावणारी व हाकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी केली असून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. मंदिर परिसरात उभारलेली दुकाने व लोकांच्या गर्दीने सोनुर्ली नगरी गजबजून गेली आहे.
लोटांगणाची जत्रा म्हणून ख्याती असलेल्या सोनुर्ली माऊली देवीचा वार्षिक उत्सवाला प्रारंभ झाला. पहाटे पुरोहितांकडून देवीची विधीवत पुजा केल्यानंतर भाविकांना देवीचे दर्शन खुले करण्यात आले. तत्पुर्वी रात्री देवीची पालखी मंदिराभोवती फिरवून दीपमाळा प्रज्वलित करून जत्रोत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. सकाळी देवीचे दर्शन खुले करण्यात आल्यानंतर भाविकांची दर्शनासाठी एकच झुंबड उडाली. चेंगराचेंगरी व गर्दी होऊ नये म्हणून देवस्थान समितीचे स्वयंसेवक आणि पोलिस शिस्तबद्धपणे भाविकांना आत सोडत आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला दरवर्षी प्रमाणे दर्शनासाठी उभ्या असलेल्या भाविकांसाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. माऊली कला क्रीडा मंडळाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली असून पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिसांच पथक प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहे.
वार्षिक उत्सवानिमित्त देवी माऊलीची मूर्ती सजविण्यात आली आहे. सोन्या- चांदीच्या दागिन्यात मढविलेली मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. देवीच्या दर्शनानंतर प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर वेगळाचा आनंद दिसून येत आहे. रात्री साडेअकरा वाजता उपवासकरी भाविकांचा लोटांगणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.










