वालावलकर रुग्णालयात सवलतीच्या दरात मेंदू स्कॅन आणि स्ट्रोक उपचार शिबिर

Edited by: विनायक गांवस
Published on: November 05, 2025 15:51 PM
views 20  views

सावंतवाडी : कोकणातील रुग्णांना अत्याधुनिक मेंदू तपासणी आणि स्ट्रोकवरील उपचारांची सुविधा सहज आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावी या उद्देशाने डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात १५ व १६ नोव्हेंबर रोजी पहिल्यांदाच सेरेब्रल अँजिओग्राफी व स्ट्रोक व्यवस्थापन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रेडिओलॉजी आणि न्युरोसर्जरी विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात येत आहे.

या शिबिरासाठी मुंबईतील प्रख्यात तज्ज्ञ डॉक्टर्सची टीम वालावलकर रुग्णालयात येणार आहे, ज्यात डॉ. नितीन डांगे (संचालक व विभागप्रमुख, इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजी व स्ट्रोक), डॉ. कुशल भाटिया आणि डॉ. मयूर घरात (सल्लागार, इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजी व स्ट्रोक) यांचा समावेश आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील रुग्णांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार मिळू शकतील.

सेरेब्रल अँजिओग्राफी: ही अत्याधुनिक तपासणी मेंदूतील रक्तवाहिन्यांचे स्पष्ट चित्र दाखवते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये असलेले ब्लॉकेज, ॲन्युरिझम किंवा इतर अनियमितता वेळीच ओळखता येतात, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका टळू शकतो.

जीव वाचवणारे स्ट्रोक उपचार: स्ट्रोकवर तात्काळ उपचार म्हणून मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टॉमी (ठरावीक वेळेत मेंदूतील रक्ताच्या गाठी काढणे) आणि रक्तवाहिन्या उघडण्यासाठी कॅरोटिड स्टेंटिंग यांसारख्या जीव वाचवणाऱ्या पद्धती शिबिरात उपलब्ध असतील.

या शिबिराविषयी माहिती देताना प्रमुख रेडिओलॉजिस्ट डॉ. नेताजी पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना वेळेत मेंदू स्कॅन किंवा स्ट्रोक उपचार मिळत नाहीत. पूर्वी अशा क्लिष्ट जोखमीच्या शस्त्रक्रिया फक्त मुंबई किंवा पुणे येथेच केल्या जात असत. मात्र आता वालावलकर रुग्णालयात अशा क्लिष्ट शस्त्रक्रिया महात्मा ज्योतीबा जनआरोग्य योजने मार्फत मोफत केल्या जाणार आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड येथील कोकणवासियांनी या सुविधेचा फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

नोंदणीसाठी आवाहन :

या महत्त्वाच्या शिबिरासाठी नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क क्र. ८४२११९०१४९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.