
सावंतवाडी : बांदा येथील मुस्लिम फुलव्यापारी आफताब कमरूद्दीन शेख याच्या आत्महत्येप्रकरणी काही व्यक्तींकडून 'दिशाभूल' करून हिंदू समाजाला आणि विशिष्ट तरुणांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा आरोप सकल हिंदू समाजाने केला आहे. याबाबत सकल हिंदू समाजाने आज बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन सादर केले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच दिशाभूल करणाऱ्या कारवाया त्वरित न थांबल्यास सकल हिंदू समाजाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही दिला आहे.
आज बांदा पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे यांना सकल हिंदू समाजाकडून हे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे, सावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण आदी उपस्थित होते. हिंदू समाजाने दिलेल्या या निवेदनात नमूद केले आहे की, सुमारे वर्षभरापूर्वी आफताब शेख फुलांवर थुंकून ती देवकार्याकरिता विकत असल्याची तक्रार नागरिकांच्या निदर्शनास आली होती. याबाबत ८ महिन्यांपूर्वी पोलिसांत संपर्क साधून हा प्रकार थांबविण्यात आला होता. यामुळे संबंधित व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचे नागरिकांना वाटत होते. बांदा गावात इतर मुस्लिम व्यापारी असताना त्यांच्याबाबत अशी तक्रार कधीही आली नाही. त्यामुळे आफताब शेख यांचे वर्तन मानसिकदृष्ट्या विचलित असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच आफताब शेख यांच्या आत्महत्येच्या दुर्दैवी घटनेचा गैरवापर करून काही व्यक्ती एका कथित व्हिडिओद्वारे जाणीवपूर्वक हिंदू समाजाला बदनाम करत आहेत. तसेच हिंदू समाजातील विशिष्ट तरुणांना लक्ष करून त्यांच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे हिंदू-मुस्लिम समाजातील शांतता भंग होण्याची शक्यता आहे.
सकल हिंदू समाजाने या गंभीर प्रकरणाच्या अनुषंगाने, शांतता राखण्यासाठी आणि सत्य बाहेर आणण्यासाठी पुढील पाच महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. आत्महत्येमागील कौटुंबिक परिस्थिती, घरातील तणाव आणि वादविवाद यांची तपासणी व्हावी. तसेच मृतावर कोणतेही आर्थिक दडपण, कर्जबाजारीपणा किंवा आर्थिक देवाणघेवाण होती का ? याचा शोध घ्यावा. त्याचे मानसिक आरोग्य आणि पूर्वीच्या वागणुकीसह त्यावर उपचार सुरू होते का ? याची तपासणी व्हावी तसेच आत्महत्येपूर्वी व्हायरल होत असलेला व्हिडिओ कोणी रेकॉर्ड केला ? त्यावेळी कोण उपस्थित होते आणि तो कोणत्या हेतूने प्रसिद्ध केला गेला, याची तपासणी व्हावी. कोणताही सबळ पुरावा नसताना केवळ हिंदू समाज अथवा हिंदू तरुणांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे का ? याचा शोध घेऊन योग्य कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच निवेदनाच्या शेवटी, या घटनेचा राजकीय, धार्मिक किंवा सामाजिक गैरवापर होऊ नये, तसेच निर्दोष व्यक्तींवर अन्याय होऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
जर अशा दिशाभूल करणाऱ्या कारवाया त्वरित थांबल्या नाहीत, तर सकल हिंदू समाजाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी शामकांत काणेकर, लवू महाडेश्वर, स्वागत नाटेकर, शितल राऊळ, कृष्णा धुळपनवर, सुधीर राऊळ, मंदार कल्याणकर,आशिष कल्याणकर,साई कल्याणकर,मनोज कल्याणकर,सौरभ आगलावे ,नंदू केळुस्कर,संदेश पटेकर, सागर सावंत, सखाराम देसाई,गौरी कल्याणकर,नंदू कल्याणकर, केदार कणबर्गी, सोमकांत नानोस्कर, शैलेश केसरकर,वीरेंद्र आठलेकर,सर्वेश मुळ्ये, गुरुनाथ साळगावकर, कुणाल वरसकर, तन्वी काणेकर, प्रिया नाटेकर आदींसह हिंदू बांधव उपस्थित होते.











