
सावंतवाडी : सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित 'मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा' ह्या ब्रीदखाली आयोजित 'राज्यस्तरीय सन्मान सोहळा 2025' अंतर्गत ग्रामपंचायत शेर्ले येथील सरपंच प्रांजल प्रशांत जाधव यांना मानाचा 'राज्यस्तरीय आदर्श सरपंच सन्मान 2025' सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
यावेळी सरपंच सेवा संघाचे समर्थक बाबासाहेब पावसे पाटील तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, कालभक्त श्रीमंत डॉ. श्रीकांत धुमाळ महाराज (उज्जैन), ग्रामसेवक नेते एकनाथ ढाकणे व अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते तसेच यादवराव पावसे पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी माऊली संकुल सभागृह सावेडी रोड, अहिल्यानगर येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरम्यान "हा राज्यस्तरीय पुरस्कार माझा एकटीचा नसून आमचे मार्गदर्शक माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर, युवकांचे आयडॉल आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब तसेच माझ्यासोबत कार्यरत असलेले उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी व शेर्ले गावाचा आणि ज्याच्यामुळे मला हा अधिकार मिळाला ते आमच्या हृदयात असलेले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माझे जन्मदाते आई-बाबा, मला सदैव खंबीर साथ देणारे माझे पती प्रशांत जाधव यांच्यामुळे हा सन्मान आपल्याला मिळाल्याची भावना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त सरपंच सौ. प्रांजल जाधव यांनी व्यक्त केली.











