
सावंतवाडी : भाजपात हे लोक नाराज होते. ते उबाठात जाऊ नये म्हणून मीच त्यांना संपर्क केला. काही लोकांनी आव्हान दिलेले घेऊन दाखवा, घेऊन दाखवलं असा टोला मित्रपक्षाच्या नेत्याना शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी हाणला. अजय गोंदावळे यांच्या पक्षप्रवेशावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मी प्रवेश घेतलाय. त्यामुळे फोन मला करा, चांगल्या उत्तराची अपेक्षा ठेऊ नका. हे बर्थडे गिफ्ट समजा अशी कोपरखळीही त्यांनी मारली.
परब म्हणाले, उत्तर द्यायला मी सक्षम आहे. त्यामुळे मला फोन करा. फोन नाही केलात तरच ठीक, चांगल्या उत्तराची अपेक्षा ठेऊ नका असं विधान करत प्रवेशकर्त्या कुणाच्या केसालाही धक्का लागणार नाही असे त्यांनी सांगितले. अजय गोंदावळे जिल्हा कार्यकारिणी सदस्य होते. तिनं बुथ अध्यक्ष व पक्षाचे ४० सदस्य शिवसेनेत आलेत. शहरात त्यांचा फायदा होईल, दातृत्व अन् नेतृत्व त्यांच्याकडे आहे. आणखीन काहीजण संपर्कात आहेत. ते देखील पक्षप्रवेश करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मैत्रीपूर्ण लढतीची घोषणा केली आहे. आम्ही मैत्रीपूर्ण पद्धतीने पक्षप्रवेश करत आहोत. त्यामुळे कुणीही वाईट वाटून घेऊ नये. निवडणूकीत युती करायची नसेल तर नाही म्हणून सांगा. पण, विशेषण लावू नका. आम्हीही सक्षम आहोत. शिवसैनिक लढवय्या आहे. अंगावर घ्यायची तयारी आमची आहे असंही आव्हान दिलं.
यावेळी शहरप्रमुख बाबु कुडतरकर म्हणाले, अजय गोंदावळे माझे मित्र आहेत. त्यांचे शिवसेनेत स्वागत करत असून जोमात काम करू असा विश्वास व्यक्त केला. युवा कार्यकर्ते आमच्याकडे आलेत. त्यांचा फायदा होईल असे मत महिला शहरप्रमुख भारती मोरे यांनी व्यक्त केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे, महिला शहरप्रमुख भारती मोरे यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.










