
सावंतवाडी : मुक्ताई ॲकेडमीच्या सावंतवाडी, कुडाळ, मालवण येथील विदयार्थी - विदयार्थिनींनी क्रिडा व युवक सेवा संचालनालय आणि सिंधुदुर्ग जिल्हा क्रिडाधिकारी यांच्या आयोजनाखाली घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करुन विभाग स्तरावर झेप घेतली. गार्गी सावंत, साक्षी रामदुरकर, सई परुळेकर, चिदानंद रेडकर, वसंत गवस, इत्यादी विदयार्थ्यांची सातारा येथे होणा-या विभागस्तरीय बुदधिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. सर्व यशस्वी विदयार्थ्यांना राष्ट्रीय बुदधिबळपटू बाळकृष्ण पेडणेकर आणि मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांचे मार्गदर्शन मिळाले.
मुलींमध्ये चौदा वर्षाखालील गटात गार्गी सावंत आणि सतरा वर्षाखालील गटात साक्षी रामदुरकर यांनी सहापैकी पाच राऊंड्स जिंकून अनुक्रमे तिसरा व दुसरा क्रमांक पटकावला. एकोणीस वर्षाखालील गटात सई परुळेकर हिने पाचपैकी चार राऊंड्स जिंकून चौथा क्रमांक पटकावला. मुलांमध्ये सतरा वर्षाखालील गटात वसंत गवस आणि एकोणीस वर्षाखालील गटात चिदानंद रेडकर यांनी सहापैकी पाच राऊंड्स जिंकून अनुक्रमे तिसरा व दुसरा क्रमांक पटकावला. सतरा वर्षाखालील गटात पार्थ गावकर आणि वसंत गवस यांनी इंटरनॅशनल रेटेड खेळाडूंवर विजय मिळवून स्पर्धेत सनसनाटी निर्माण केली. रेटेड खेळाडूंना त्यांनी स्पर्धेबाहेर केले.सुप्रसिदध अभिनेते, दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर, सिरियल व चित्रपट कलाकार दिपक कदम, शशिकांत केरकर, अनिश म्हैसाळकर, ऋतिक भोईर, इत्यादी मान्यवरांनी मुक्ताई ॲकेडमीला सदिच्छा भेट देऊन सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे कौतुक केले.










