....तर तिसऱ्याचा लाभ होणार नाही : दीपक केसरकर

Edited by: विनायक गांवस
Published on: October 21, 2025 17:12 PM
views 100  views

सावंतवाडी : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुतीने एकत्र लढवाव्यात अशी इच्छा माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे. महायुतीने एकत्र निवडणूक लढवल्यास जिल्ह्यात चांगले वातावरण राहील आणि विनाकारण आपापसात भांडून तिसऱ्याचा लाभ होणार नाही, असे मत त्यांनी मांडले.

केसरकर म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबतचे निर्णय वरिष्ठ स्तरावर घेतले जातात. त्यामुळे कोणताही अंतिम निर्णय जाहीर करणे योग्य नाही. निवडणूक एकत्र लढवण्यावर आमची भूमिका आहे. शेवटी निवडणूकीपूर्वी अधिकृत घोषणा अधिकृत प्रवक्त्यांकडून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपच्या स्थानिक पातळीवरील स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर बोलताना ते म्हणाले, चर्चा न करता भाजपचा असा काही निर्णय झाला असेल आणि तो जर जाहीर झाला, तर आपल्यालाही तयारी करणे सोपे जाईल, असे विधान त्यांनी केले. 

दरम्यान, सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने असून, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणाऱ्यांचे सरकारने स्वागत केले आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याची सरकारची भूमिका आहे. महायुतीचा महापौर कोण होणार हे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री ठरवतील आणि तो वादाचा मुद्दा नाही. महापालिकेवर महायुतीचा भगवा हे आमचे उद्दिष्ट आहे. महेश कोठारे हे चांगले कलाकार आहेत. त्यांच्या एखाद्या विधानाचा आणि सिनेमातील भूमिकेचा संबंध जोडून स्टेटमेंट करणे अत्यंत चुकीचे आहे. संजय राऊत यांनी संयमाने वक्तव्ये केली पाहिजेत आणि दुसऱ्याने बोललेले ऐकून घेण्याची सवय लावून घेतली पाहिजे. राऊत नेहमीच टीकात्मक बोलतात. त्यांच्या टीकेतून वाईट नाही तर चांगलेच होते. आमची महायुती मजबूत आहे. कितीही प्रयत्न केले तरी महायुतीत गैरसमज निर्माण होणार नाही. महायुती पुढील २५ वर्षे सत्तेत राहील.  


ओंकार हत्तीला पकडण्यासाठी मोहीम सुरू आहे. हत्तीला ठेवण्यासाठी कंपाउंड तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. कंपाउंड पूर्ण झाल्यावरच हत्तीला पकडले जाईल, कारण आधी पकडल्यास त्याला माणसाळावे लागते, अशी माहिती आमदार केसरकर यांनी दिली.