सावंतवाडीत धम्मचक्र प्रवर्तन दिनी कार्यक्रमांचं आयोजन

Edited by: विनायक गांवस
Published on: October 03, 2025 17:16 PM
views 164  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ, मुंबईतर्फे ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सावंतवाडी येथे ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग व गोवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून तो रविवार दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी वैश्य भवन, गवळी तिठा, सावंतवाडी येथे संपन्न होणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.३० वाजता प्रतिमा पूजन व पंचशील वाचनाने होईल. त्यानंतर दीपप्रज्वलन, स्वागतगीत, व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रम अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. संदीप कांबळे (रत्नागिरी) हे असतील. ते “महामानव ते बुद्धत्व – सर्वसामान्यांसाठी एक चिंतनशील प्रवास” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. संदीप कांबळे यांनी संस्कृत व पाली भाषेमधून एम.ए. असून पाली व प्राकृत या भाषेमध्ये एम.फिल. केलेले आहे. तसेच अॅग्रिकल्चर ऑफ ऑरगॅनिक फार्मिंग या विषयातून पीएच.डी. केलेले असून ते बौद्ध धम्माचे अभ्यासक आहेत.

यावेळी डॉ. विकास कांबळे (माजी प्राचार्य-भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय, सावंतवाडी) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त समाजात धम्मक्रांतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे बौद्ध धम्म स्वीकारून भारतीय समाजरचनेत नवा अध्याय सुरू केला. त्यातून समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित सामाजिक क्रांतीची सुरुवात झाली. या ऐतिहासिक धम्मक्रांतीतील समरूप प्रेरणा घेणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी भिमसुपुत्र क्रांती ग्रुप, सावंतवाडी यांच्या भिमगीतांच्या गायनानंतर होणार असून, धम्म अनुयायांनी, सुजाण नागरिकांनी धम्म प्रवचनासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.