शिरशिंगेत शेतकरी संवाद मेळावा

Edited by: विनायक गांवस
Published on: October 01, 2025 19:27 PM
views 24  views

सावंतवाडी : वेर्ले विकास संस्था, शिरशिंगे विकास संस्था आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील शिरशिंगे व वेर्ले येथे आयोजित शेतकरी संवाद मेळावा उत्साहात पार पडला. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आणि जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांच्या संकल्पनेतून हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या मेळाव्याचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणे, त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि बँकेच्या माध्यमातून त्यावर उपाययोजना करणे हा होता. प्रास्ताविकपर भाषणात संचालक रवींद्र मडगावकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वस्त केले. शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांच्या शेतीमधील समस्यांवर आवश्यक त्या उपाययोजना बँकेमार्फत केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

मेळाव्यात महाराष्ट्र सरकारचे आरोग्य खाते आणि शेती खाते यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आरोग्य खात्यामार्फत आयुष्मान योजनेसारख्या योजनांबद्दल विस्तृत माहिती देण्यात आली, तसेच आरोग्याबाबतच्या समस्या आणि उपाययोजनांवर मार्गदर्शन करण्यात आले. शेती खात्यामार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध असलेल्या विविध सबसिडीज आणि नवनवीन योजनांबाबत माहिती देऊन सजग करण्यात आले. उपस्थित शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्यांवर अधिकाऱ्यांकडून योग्य ते उपाय सुचवले गेले. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत त्यांच्या वेगवेगळ्या डिजिटल सेवा, बचतीचे महत्त्व, आणि विविध कर्ज योजनांबद्दल माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले. तसेच, उपस्थित शेतकऱ्यांमध्ये सिंधुदुर्ग बँकेच्या एटीएम कार्डचे वितरण करण्यात आले.

मेळाव्याचे अध्यक्षस्थान भूषवताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष  मनीष दळवी यांनी तरुण शेतकरी वर्गाला महत्त्वाचे मार्गदर्शन केले. त्यांनी जिल्ह्यातील जैवविविधता आणि निसर्गाचा उपयोग करून पर्यटनावर आधारित व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन केले. तरुण शेतकऱ्यांनी कमी पगाराच्या शहरातील नोकऱ्यांपेक्षा आपल्या जमिनीचे मूल्य ओळखून शेती व शेतीपूरक व्यवसायांना अग्रक्रम द्यावा, असे ते म्हणाले. श्री. दळवी यांनी जिल्ह्याला सध्या दोन लाख लिटर दुधाची आवश्यकता असून, सध्या केवळ एक लाख लिटर दुधाची निर्मिती होत असल्याचे नमूद केले. त्यामुळे तरुण शेतकरी वर्गाने दुग्ध व्यवसायासाठी पुढे यावे आणि यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ (कर्ज) व प्रशिक्षण बँक उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही दिली.

जिल्ह्यातील सर्वात शेवटच्या व्यक्तीपर्यंत चांगल्या प्रतीचे बँकिंग पोहोचवण्याचे बँकेचे उद्दिष्ट असून, त्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे अध्यक्ष श्री. दळवी यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गाठलेला ६००० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा आणि वेगवेगळ्या स्तरांवर प्राप्त केलेले अव्वल स्थान, याचे सर्व श्रेय त्यांनी जिल्ह्यातील मायबाप ग्राहकांना दिले. 'आपला विश्वास, आपली साथ' अशीच कायम राहील आणि बँक नवनवीन योजना घेऊन ग्राहकांसमोर येत राहील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या शेतकरी मेळाव्यात सैनिक बँकेचे चेअरमन बाबुराव कविटकर, सीईओ सुनील राऊळ, वेर्ले विकास सोसायटीचे चेअरमन विजय राऊळ, सरपंच सौ. रुचिता राऊळ, उपसरपंच मोहन राऊळ, आणि सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य तसेच शिवा राऊळ, लाडजी राऊळ, बाबा राऊळ, भगवान राणे, पुंडलिक कदम यांसह मोठा शेतकरी वर्ग उपस्थित होता. शिरशिंगे येथे गावचे सरपंच दीपक राऊळ, सोसायटीचे चेअरमन दिलीप राणे, व्हाईस चेअरमन रघुनाथ परब, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष नारायण राऊळ यांच्यासह अनेक मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर पावसकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन भगवान राणे यांनी केले.