
सावंतवाडी : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांसोबत विद्यार्थी,पालक आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग पोलीस यंत्रणा नेहमीच तुमच्या मदतीसाठी तत्पर असते, त्यांना सहकार्य करून घडणारी गुन्हेगारी आपण रोखू शकतो. त्यासाठी शाळा कॉलेजसोबत समाजातील सर्व घटकांनी जागृत असणे गरजेचे आहे, असे मत सिंधुदुर्ग जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी व्यक्त केले.
राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथे आयोजित 'विद्यार्थी सुरक्षा मार्गदर्शन' कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या सुरक्षिततेच्या उपाययोजनेसाठी आपण काय केले पाहिजे. कोणती दक्षता घेतली पाहिजे. या अनुषंगाने देखील त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे दुसरे मार्गदर्शक म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे तसेच 'भरोसा सेल' पोलिस अधीक्षक कार्यालय सिंधुदुर्ग यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी स्व सुरक्षेसाठी कोणती काळजी आणि दक्षता घेतली पाहिजे हे सांगताना, विद्यार्थ्यांनी सायबर गुन्हे आणि लैंगिक अत्याचाराबद्दल जागरूक राहणे महत्त्वाचे आहे. सोशल मीडिया आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरताना आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नये. अनोळखी लोकांपासून सावध राहावे. सायबर गुन्हे किंवा लैंगिक छळाचा अनुभव आल्यास, त्वरित आई-वडील , शिक्षक आणि पोलिसांशी संपर्क साधावा किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर तक्रार दाखल करावी. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाशीही संपर्क साधता येतो. असे सांगून घडणाऱ्या गुन्हेगारी कसे थांबवायचे या याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केले. या कार्यक्रमाला सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण तसेच पोलीस कर्मचारी तर उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, सांस्कृतिक कमिटी प्रमुख प्रा.डॉ संजना ओटवणेकर, प्रसिद्धी कमिटी प्रमुख प्रा. संतोष पाथरवट, सांस्कृतिक कमिटी सदस्य प्रा. वामन ठाकूर, प्रा.जोसेफ डिसिल्वा, महाश्वेता कुबल, प्रा. विनिता घोरपडे,प्रा. सविता माळगे,प्रा.डाॅ.अजेय कामत,प्रा.रणजीत राऊळ, प्रा.पवन वनवे ,प्रा.दशरथ सांगळे, प्रा.माया नाईक,प्रा.सृहा टोपले,प्रा.निलेश कळगुंटकर , प्रा. राहुल कदम इ. सर्व प्राध्यापक उपस्थित होते. सर्व शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मिलिंद कासार.यांनी केले तर आभार प्रा.डॉ संजना ओटवणेकर यांनी मानले.










