ट्रामा केअर युनिट'वर शुक्रवारी खंडपीठात सुनावणी

बांधकामासंदर्भातील महत्त्वपूर्ण फाईल गहाळ ?
Edited by: विनायक गांवस
Published on: October 01, 2025 18:56 PM
views 154  views

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील चर्चेत आलेल्या ''ट्रामा केअर युनिट'' च्या बांधकामासंदर्भातील  महत्त्वपूर्ण फाईल गहाळ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही फाईल मिळत नसल्याचे तोंडी कळवले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे याच संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात जनहित याचिका दाखल आहे. याचिकेवर  सुनावणी 3 ऑक्टोबरला असतांना इकडे अचानक फाईल गायब झाल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

जाधव यांचे बंधु तथा सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांनी 22 सप्टे 2025 रोजी माहितीच्या अधिकारात बांधकाम विभागाकडे अर्ज केला. या अर्जाद्वारे ट्रामा केअर युनिट संदर्भात माहिती मागवली होती. बांधकाम विभागाने ट्रामा केअर युनिटच्या बांधकामासाठी 51 लाख 53 हजार रुपये प्रशासकीय मान्यता आणि 32 लाख 53 हजार रुपये तांत्रिक मान्यता दिल्याचे पत्र दिले. मात्र, ट्रामा केअयचे बांधकाम पूर्ण झाले अथवा नाही ? याबाबत माहिती दिली नाही. त्यामुळे माहितीच्या अधिकारात अपिल अर्ज दाखल केला. ट्रामा केअर युनिटचे कंपलिशन सर्टफिकेट, एम.बी.रजिस्टर च्या नोंदी पाहण्यास मागितल्या. तसेच या प्रति मागविल्या असता ती फाईल मिळत नसल्याचे उत्तर श्री.जाधव यांना देण्यात आले. 

वास्तविक याच फाईल मधील प्रशासकीय मान्यता आणि तांत्रिक मान्यता पत्रे मिळाली. मात्र, काम पूर्ण झाल्यासंदर्भात कंपलिशन सर्टीफिकेट वा एम.बी.रजिस्टर मागितले असता ते थोडक्याच दिवसात गहाण कसे झाले ? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी उपस्थित केला आहे.

यासंदर्भात जाधव यांनी बांधकाम विभागाचे अभियंता श्री. चव्हाण यांना संपर्क केला असता सध्या फाईल मिळत नाही. फाईल मिळाल्यावर माहिती देऊ असे तोंडी उत्तर देण्यात आल्याचे उत्तर अभिनव फाऊंडेशनचे राजू केळुसकर यांना माहितीच्या अधिकार अर्जावर तोंडी स्वरुपात देण्यात आले.