अनियमित बस सेवा

कारिवडे ग्रामस्थांचं आगार प्रमुखांना निवेदन
Edited by: विनायक गांवस
Published on: October 01, 2025 18:48 PM
views 115  views

सावंतवाडी : कारिवडे येथून सावंतवाडीला येणारी कालिका मंदिर बस सेवा वारंवार अनियमित आणि विलंबाने होत असल्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. या बस सेवेच्या त्रासामुळे संतप्त झालेल्या कारिवडे ग्रामस्थांनी सावंतवाडी एस.टी. आगार प्रमुखांची भेट घेऊन जाब विचारत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. 

बस सेवा तात्काळ सुरळीत आणि वेळेवर न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. कारिवडे गावातून सावंतवाडी शहरात भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या महिला, नोकरदार, ग्रामस्थ आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांचे या अनियमित बस सेवेमुळे मोठे हाल होत आहेत. बस वेळेवर न सुटल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास उशीर होतो, तर भाजी विक्रेत्या महिलांना आणि इतर ग्रामस्थांना शहरात वेळेवर पोहोचता येत नाही, ज्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक आणि वेळेचे नुकसान होते. अनेकदा बस रद्द होण्याच्या प्रकारांमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी कारिवडे गावचे सरपंच सौ. आरती माळकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आगार प्रमुख श्री. गावित यांची भेट घेतली. यावेळी भाजपा आंबोली मंडळ उपाध्यक्ष अशोक माळकर, ग्रामपंचायत सदस्य महेश गांवकर, सौ. तन्वी साईल, माजी पंचायत समिती सदस्या सौ. प्राजक्ता केळुसकर, माजी सरपंच श्री. तानाजी साईल, माजी उपसरपंच श्री. केशव साईल, सामाजिक कार्यकर्ते श्री. आनंद तळवणेकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री. प्रशांत राणे, सोसायटी संचालक श्री. सोनु सावंत, श्री. रुपा सावंत, श्री. आत्माराम (अमर) धोंड यांच्यासह भैरववाडी, साईलवाडी, सावंतवाडा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहता आगार प्रमुख श्री. गावित यांनी यापुढे कालिका मंदिर बस सेवा कोणत्याही परिस्थितीत सुरळीत आणि वेळेवर सोडण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावर तोडगा न निघाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.