किकबॉक्सिंगमध्ये सिंधुदुर्गच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

Edited by: विनायक गांवस
Published on: September 30, 2025 18:34 PM
views 58  views

सावंतवाडी : जिल्हा क्रीडा संकुलात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत सिंधुदुर्गच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत दिमाखदार यश संपादन केले आहे. बांदा, सावंतवाडी, मळगाव आणि शिरोडा यांसारख्या भागांतील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत एकूण २७ पदकांची कमाई केली. स्पर्धेतील एकूण निकाल अत्यंत लक्षवेधक असून यामध्ये ६ सुवर्ण, ९ रौप्य आणि १२ कांस्य पदके पटकावण्यात आली. सर्व वयोगटांतील खेळाडूंनी या विजयात आपला सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळ सादर केला.

रिंगमधील थरार, दर फटक्यावर प्रेक्षकांचा जल्लोष आणि खेळाडूंचा प्रचंड आत्मविश्वास यामुळे संपूर्ण वातावरण उत्साहाने भरलेले होते. या नेत्रदीपक यशामागे प्रशिक्षक श्री. किरण देसाई यांचे कुशल मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. त्यांनी खेळाडूंना शिस्त, फिटनेस आणि तांत्रिक कौशल्यांवर भर देत कठोर प्रशिक्षण दिले. खेळाडूंची मेहनत, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा पाठिंबा आणि शाळेचा सक्रीय सहभाग यांचा समन्वय या यशासाठी कारणीभूत ठरला आहे.

सध्या या विजेत्या खेळाडूंचे गावोगावी सत्कार होत असून, संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. आता या सर्व यशानंतर, “या चमकदार कामगिरीला पुढे नेत, आपल्या भागातील खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरही यश मिळवावे!” अशी अपेक्षा सिंधुदुर्गकरांनी व्यक्त केली आहे.