दुर्गामाता दौडला प्रतिसाद

Edited by: विनायक गांवस
Published on: September 28, 2025 17:34 PM
views 481  views

सावंतवाडी : शिवशंभू गृप, मळगाव यांच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या श्री दुर्गामाता दौडला मळगाव येथील हिंदूप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उत्साहात सहभाग घेतला. या दौडीमुळे नवरात्रोत्सवातील भक्ती आणि शौर्य परंपरेचा जागर झाला. या दौडीत सहभागी झालेले नागरिक पारंपरिक वेशभूषेत तर विद्यार्थी शालेय वेशभूषेत सहभागी झाले होते, ज्यामुळे एक वेगळे चैतन्य निर्माण झाले होते.

सकाळच्यावेळी ठीक ८ वाजता येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या दौडीचा प्रारंभ करण्यात आला. दौड सुरू करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला, तसेच भगव्या ध्वजाचे पूजन व पुष्पहार अर्पण करून दौडची विधिवत सुरुवात झाली.

यावेळी बोलताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी अभिषेक रेगे यांनी दुर्गामाता दौडीचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज पोटात असताना नवरात्र सणात अखंड नऊ दिवस तुळजाभवानीचा जागर करून देशासाठी आणि हिंदू धर्मासाठी मागितलेले वरदान, मागितलेले आशीर्वाद पुनररुपी मागण्याची प्रथा म्हणजेच ही दुर्गामाता दौड आहे. दौडीदरम्यान, "छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय", "धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय", "जय भवानी", "जय शिवराय", "भारत माता की जय", "हिंदू धर्म की जय" अशा घोषणांनी मळगावातील परिसर दुमदुमून गेला होता. ही दौड छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून रस्तावाडी, सुतारवाडी, पिंपळवाडी, नाईकवाडी आदी वाड्यांमधून काढण्यात आली आणि तिची सांगता श्री देव मायापूर्वचारी मंदिर येथे झाली. मंदिरात पोहोचल्यावर सर्व सहभागींनी सर्वप्रथम मायापूर्वचारी देव आणि श्री देवी माऊलीचे दर्शन घेतले. त्यानंतर भगव्या ध्वजाला नमस्कार करून गणपती, शंकर, दुर्गा देवीची व भारत मातेची आरती करून दौडीची उत्साहात सांगता करण्यात आली. या दौडीमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी अभिषेक रेगे, सुमित नलावडे, शुभम घावरे, आकाश खिल्लारे, संपदा राणे; सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे दुर्गसेवक सुनील राऊळ, एकनाथ गुरव, प्रताप परब, शुभम नाईक, गजानन दळवी तसेच प्रकाश राऊळ, सहदेव राऊळ, रितेश राऊळ, ज्ञानेश्वर राणे, समिधा राऊळ, प्रगती राऊळ, हिंदू बंधू भगिनी व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.