
सावंतवाडी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. अनेक मान्यवरांनी अध्यक्षस्थान भूषविलेल्या या संस्थेचे अध्यक्षपद हा आपला गौरव आहे अशा शब्दांत श्री. राणेंनी शुभेच्छा देत सिंधुदुर्गच्या शैक्षणिक क्षेत्रात 'AI' क्रांती घडेल असा विश्वास देखील व्यक्त केला.
पालकमंत्री नितेश राणे शुभेच्छा देताना म्हणाले, या पदाच्या व संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्गसहीत कोकणच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी मोठे काम आपल्या हातून घडाव, आमची सदैव साथ राहील. आपल्या संस्थेच्या माध्यमातून Al सारख्या तंत्रज्ञानाच्या शिक्षणाचा समावेश करण्यात यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी त्याचा उपयोग होईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कै. विकासभाई सावंत यांचे व आमचे नेहमीच सलोख्याचे संबंध होते. त्यांचा वारसा आपण जतन करीत आहात. आपल्यासारख्या उच्च विद्याविभूषित युवकांचा या क्षेत्रात होणारा सहभाग हा निश्चितच गौरवास्पद आहे. शैक्षणिक क्षेत्रात AI माध्यमातून एक नवी क्रांती घडविण्यासाठी आपल्यासारख्या तरुणांची गरज आहे. त्यामुळे तुमच्या वाटचालींना आमची सदैव साथ असेल अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, संस्थेचे खजिनदार सी.एल. नाईक, अमोल सावंत, भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, ॲड. नकुल पार्सेकर, प्रा. सतीश बागवे, राजू राणे, राजन म्हापसेकर, संजय कानसे, सुधीर मल्हार, चंद्रकांत राणे आदी उपस्थित होते. यावेळी आरडी हायस्कूलच्या पटांगणात स्केटिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेत नितेश राणे यांनी त्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या क्रीडा तसेच अन्य सर्व सुविधांसाठी पालकमंत्री या नात्याने जी काही मदत करता येईल ही सर्वस्वी मदत आपण करू, असे आश्वासन यावेळी श्री. राणे यांनी विक्रांत सावंत यांना दिले.










