
सावंतवाडी : कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष व समाजकार्यातून राज्यभर स्वतंत्र छाप उमटवणारे दयानंद कुबल यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि युवकांशी संबंधित विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली.
जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना आपल्या कार्यकौशल्य आणि सकारात्मक दृष्टिकोनातून तृप्ती घोडमिसे यांनी समाजाच्या विविध स्तरात नवे आदर्श निर्माण केले आहेत. त्यांची कार्यपद्धती युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी घेतलेले पुढाकार विशेष महत्त्वाचे मानले जातात.
या चर्चेदरम्यान युवक रोजगार, शिक्षणाच्या संधी, महिला सबलीकरण तसेच आरोग्यविषयक उपक्रमांबाबत विधायक संवाद झाला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अधिकाधिक संधी मिळाव्यात यासाठीही महत्त्वपूर्ण विचारमंथन करण्यात आले. यावेळी दयानंद कुबल यांच्यासोबत संस्थेचे सहकारी प्रथमेश सावंत आणि गौरी आडेलकर उपस्थित होते. जिल्ह्यातील सामाजिक उपक्रमांना प्रशासनाचे सहकार्य मिळावे आणि तरुणाईला योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने हा संवाद महत्त्वपूर्ण ठरल्याचे श्री. कुबल यांनी नमूद केले.
जिल्हाधिकारी श्रीमती घोडमिसे यांनी अशा सकारात्मक चर्चांमुळे समाजहिताचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.










