
सावंतवाडी : शहरातील पाणीपुरवठा योजनेतून होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये पुन्हा एकदा किडे आढळल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्याधिकारी, सावंतवाडी नगरपालिका यांच्याकडे तक्रार केली असून यापूर्वीच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून २५ जुलै २०२५ रोजी बरेगार यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. तेव्हा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन पाण्याचे नमुने घेतले होते. मात्र, त्यानंतर या नमुन्यांवर कोणती कार्यवाही झाली किंवा त्यांच्या तक्रारीचे पुढे काय झाले, याबाबत कोणतीही माहिती त्यांना देण्यात आली नाही.
आज सकाळी पुन्हा नळातून येणाऱ्या पाण्यात किडे वळवळताना आढळले. नागरिकांच्या आरोग्यासाठी ही बाब अत्यंत गंभीर असून या संदर्भात बरेगार यांनी पुन्हा एकदा मुख्याधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे तक्रार केली आहे. त्यांनी सोबत किड्यांचा व्हिडिओ आणि फोटो देखील पाठवला आहे. नगरपालिकेने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी श्री. बरेगार यांनी केली आहे.










