सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयात आयसीयू आणि ट्रॉमा केअर युनिट पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी सिंधुदुर्ग शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी केली आहे. रुग्णालयात आवश्यक सोयीसुविधा आणि पुरेसे डॉक्टर नसल्यामुळे गंभीर रुग्णांना उपचारासाठी बांबोळी (गोवा) येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठवावे लागत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
रुग्णालयात आयसीयू आणि ट्रॉमा केअर युनिटची केवळ नावालाच कागदी बोर्ड आहेत. प्रत्यक्षात, पूर्णवेळ एमडी फिजिशियन, भूलतज्ञ आणि इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर उपलब्ध नाहीत. रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची १५ पदे मंजूर असून, त्यापैकी फक्त सहा नियमित डॉक्टर आहेत. उर्वरित नऊ डॉक्टर कंत्राटी पद्धतीने NHM किंवा बंधपत्रावर कार्यरत आहेत. अनेक कंत्राटी डॉक्टरांची स्वतःची खासगी रुग्णालये असून, ते तिथे पूर्ण वेळ देतात आणि उपजिल्हा रुग्णालयात फक्त काही तास सेवा देतात असा आरोपही करण्यात आला आहे.
दोन एमएस सर्जन असूनही रुग्णालयात हर्निया, अपेंडिक्स आणि सरकमसिजन वगळता इतर मोठ्या शस्त्रक्रिया होत नाहीत. तसेच, स्त्रीरोग तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर सिझेरियन शस्त्रक्रियांचे प्रमाणही घटले आहे. गेल्या चार महिन्यांत सुमारे ७४५ रुग्णांना बांबोळी येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहे. म्हणजेच, दररोज सरासरी सहा रुग्णांना गोवा येथे रेफर केले जाते.निवेदनात परशुराम पोखरे या अपघातग्रस्त तरुणाच्या मृत्यूचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याला वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने बांबोळी येथे पाठवण्यात आले होते, जिथे त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूची चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या सर्व गंभीर बाबी लक्षात घेऊन, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आयसीयू आणि ट्रॉमा केअर युनिटसाठी आवश्यक सर्व पदे भरून ते पूर्ण क्षमतेने सुरू करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी केली आहे.