सावंतवाडी पोलिसांची मोठी कारवाई !

दारूसह ९ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त ; दोन आरोपी ताब्यात
Edited by: विनायक गांवस
Published on: September 21, 2025 18:50 PM
views 1400  views

सावंतवाडी : सावंतवाडी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत ९ लाख ५७ हजार ६०० रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू व एक एर्टिगा वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

एका एर्टिगा गाडीतून (क्र. MH09/FV/8406) मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी माजगाव येथील गरड भागात सापळा रचला. तपासणीदरम्यान, संशयित वाहन अडवून तपासले असता गाडीच्या सीट कव्हरखाली विशेष कप्पे तयार करून त्यात गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या लपवल्याचे आढळले. पोलिसांनी या गाडीतून ५७ हजार ६०० रुपये किंमतीच्या एकूण १४४ दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. तसेच, दारू वाहतुकीसाठी वापरलेले ९ लाख रुपये किमतीचे वाहनही जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत महेश आप्पा पाटील (वय ३५) आणि रोहन मानसिंग केंगारे (वय ३१) दोघेही रा. हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर, अनिल धुरी आणि महेश जाधव यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. सध्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.