
सावंतवाडी : ऐतिहासिक शहर सावंतवाडीच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या आणि शहराचे हृदय मानल्या जाणाऱ्या मोती तलावात एका व्यक्तीने लघुशंका केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून संतापाची लाट उसळली आहे.
संबंधित व्यक्ती पर्यटक असल्याचा संशय असून पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर फिरत आहे. मोती तलावाच्या काठावर एका गाडीजवळ उभा असलेला एक तरुण थेट तलावाच्या पाण्यातच लघुशंका करताना दिसत आहे. त्याच्या बाजूला एक चारचाकी गाडी उभी आहे. ज्यामुळे तो स्थानिक नसून पर्यटक असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सावंतवाडी शहराची ओळख असलेल्या आणि नागरिकांच्या भावना जोडलेल्या या तलावात अशा प्रकारे किळसवाणे कृत्य केल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.स्थानिक नागरिकांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. त्या व्यक्तीवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे पुन्हा असे प्रकार घडू नयेत यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलून संबंधिताचा शोध घ्यावा आणि त्याला योग्य ती शिक्षा द्यावी, अशी मागणी केली जात आहे.