
सावंतवाडी : वाचन संस्कृती जोपासली तरच खऱ्या अर्थाने समाज प्रगल्भ होतो या भावनेतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुळ नं. ४ म्हाराठी शाळेत जागतिक साक्षरता दिन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त "सायलेंट रिडिंग अवर" हा उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमासाठी वाडीतील ग्रामस्थांना शाळेत आमंत्रित करण्यात आले होते. ग्रामस्थांनी स्वतः निवडलेली पुस्तके, कथासंग्रह, चरित्रग्रंथ, विचारप्रवर्तक लेख यांचे वाचन करून त्यातील महत्त्वपूर्ण भाग मुलांसमोर सादर केले. “पुस्तक म्हणजे ज्ञानाचे भांडार” हा संदेश मुलांना या निमित्ताने प्रत्यक्ष अनुभवता आला.
कार्यक्रमात ग्रामस्थांनी मुलांना शिकवण्याचा आनंद घेतला. वाचन करताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान व उत्साह दिसून आला. मुलांनीही लक्षपूर्वक ऐकत विविध प्रश्न विचारून आपली जिज्ञासा व्यक्त केली. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना वाचनाची आवड तर निर्माण झालीच, त्याचबरोबर चांगले विचार आत्मसात करण्याची प्रेरणाही मिळाली.शाळेचे शिक्षक जावेद तांबोळी यानी उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट करून “आजच्या डिजिटल युगात पुस्तकाचे वाचन अधिक आवश्यक आहे. आधी ग्रामस्थांनी वाचले व मुलांना सांगितले.मुलांनी दररोज थोडा वेळ पुस्तकासाठी द्यावा, यातून त्यांचा दृष्टीकोन विस्तारेल” असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग यांच्यासह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून मुलांच्या मनावर वाचनाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला.










