
सावंतवाडी : कोल्हापूर येथील शाहू सर्कलच्या महाराजा रील स्पर्धेत डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज फिजिओथेरपी विभागाचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आणि सावंतवाडीचा सुपुत्र साईश गावडे याने पुन्हा एकदा आपली प्रतिभा सिद्ध करत सलग दुसऱ्या वर्षी अव्वल क्रमांक पटकावला.
गेल्या वर्षी याच स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून नावाजलेला साईश, यंदाही आपल्या यशाची परंपरा अखंडित ठेवत अव्वल ठरला आहे. त्याच्या या यशाची सर्वत्र जोरदार चर्चा होत असून सावंतवाडीच्या भूमीतून उगवलेल्या या तरुणाने जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.
गुरुवारी रात्री ९.३० वाजता शाहू सर्कलच्या महाराजाच्या चौकात झालेल्या भव्य कार्यक्रमात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि हजारो भक्तगणांच्या साक्षीने साईशला मानाचे शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. साईशच्या या सलग विजयाने सावंतवाडीतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










