भरवस्तीत घरफोडी ; रोकड लंपास

शहरात भीतीच वातावरण
Edited by: विनायक गांवस
Published on: September 05, 2025 19:52 PM
views 68  views

सावंतवाडी : सर्वोदय नगर परिसरात गुरुवारी पहाटे ४ ते ६ च्या दरम्यान चोरट्यांनी धुमाकूळ घालत. एकाच वेळी चार ठिकाणी त्यांनी चोरीचा प्रयत्न केला. यामध्ये दोन ठिकाणी चोरट्यांना रोख रक्कम लंपास करण्यात यश मिळालं असून इतर दोन ठिकाणी केवळ घरफोडीचा प्रयत्न झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. 

गणेश चतुर्थी निमित्त घरात कोणीच नसल्याचा फायदा चोरट्याने उचलला. त्यामुळे या चोरीचा छडा लावण्याचे आव्हान सावंतवाडी पोलिसांसमोर उभे राहिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोदय नगर येथील शिक्षक कॉलनीतील रघुनाथ गवस यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरात ठेवलेले साहित्य अस्ताव्यस्त करून त्यांनी रोख ५,००० रुपये चोरले. त्याचप्रमाणे गोल्डन बेली बिल्डिंगमधील ज्ञानेश्वर यशवंत पाटकर यांच्या खोलीचं कुलूप तोडून कपाटातील रोख २५,००० रुपये लंपास केले. याच परिसरात इतर दोन ठिकाणीही चोरीचा प्रयत्न झाला. शिरोडा नाका येथील दुर्वांकुर अपार्टमेंटमधील चंद्रकांत निगुडकर यांच्या फ्लॅट क्रमांकचे कुलूप उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. मात्र त्यांना काहीही हाती लागले नाही. अशीच घटना मनोदय अपार्टमेंटमधील महेश बागवे यांच्या रूम मध्येही घडली. कुलूप तोडून आत प्रवेश करून चोरट्यांनी साहित्य अस्ताव्यस्त केलं. पण, त्यांना चोरी करता आली नाही. या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, उपनिरीक्षक माधुरी मुळीक आणि उपनिरीक्षक लोहकरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आल आहे. मात्र श्वानपतकाला चोरट्यांचा माग घेण्यात अपयश आले. स्थानिक परिसरातील खाजगी सीसीटीव्ही फुटेच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत असून गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक आणि स्थानिक पोलिसांकडून या संदर्भात कसून तपास सुरू आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे करत आहेत. दरम्यान, सर्वोदय नगर परिसरात असलेल्या खाजगी सीसीटीव्हीचे फुटेज सावंतवाडी पोलिसांनी तपासले असता यामध्ये दोघेजण तोंडाला बुरखा बांधून परिसरात वावरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या चोरी प्रकरणांमध्ये दोघांचा हात असल्याचे समोर आले आहे. अजूनही काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासण्यात येणार आहे. त्यामुळे या चोरी प्रकरणात अन्य कोणाचा हात आहे का हे सुद्धा पुढे येणार आहे. परंतु, गणपती उत्सव काळामध्ये अशा प्रकारे शहरात चोरीची घटना घडल्याने सावंतवाडी शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.