
सावंतवाडी : मुंबई - गोवा जुन्या महामार्गाला कोलगाव आयटीआय जवळ रस्त्याच्या कडेने मोठे भगदाड पडल्याने हा मार्ग एकेरी मार्गाने सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराचा परिणाम यावर्षी गणेशोत्सवामध्ये प्रकर्षाने दिसून आला. रस्त्यावर ठिकाणी असलेले खड्डे सुरळीत वाहतुकीसाठी यावर्षी अडथळ्याचे ठरले. गणेश चतुर्थी पूर्वी सर्व रस्ते सुरक्षित ठेवण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले होते. परंतु, प्रत्यक्षात रस्ते वाहतुकीसाठी असुरक्षितच दिसून आले. तालुक्यात रस्त्यावर असलेले खड्डे जैसे ते असल्याने वाहनचालकांना खड्ड्यातून आपली वाहने हाकावी लागली.
कोलगाव आयटीआयच्या ठिकाणी जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर अचानक भगदाड पडल्याने एकेरी वाहतुकीचा सामना वाहन चालकांना करावा लागत आहे. आधीच अरुंद असलेला हा महामार्गावरून एकेरी वाहतूक होत असल्याने ऐन गणपती उत्सवाच्या काळात वाहन चालकांना ही डोकेदुखी बनली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या संदर्भात तात्काळ उपयोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अर्धा अधिक रस्ता खचला असून रात्रीच्या वेळी या ठिकाणी अपघात होण्याची ही शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने बांधकामकडून दक्षता घेण्याची ही मागणी होत आहे.










