
सावंतवाडी : सावंतवाडीमध्ये मोठ्या उत्साहात गौरी - गणपती उत्सव साजरा केला गेला. लाडक्या गणपतीचे आगमन झाल्यानंतर सोनपावलांनी गौरीचे घरोघरी आगमन झाले. ग्रामीण भागासह शहरात देखील महिलांनी मोठ्या उत्साहात गौराईचे स्वागत केले.
लाडक्या गणपतीचे आगमन झाल्यानंतर सोमवारी सोनपावलांनी गौरीचे घरोघरी आगमन झाले. सातव्या दिवशी गणपतीसह गौरीच विसर्जन होणार आहे. यंदाही गौरी आगमनावेळी महिला वर्गाचा उत्साह दिसून आला. गौराईच्या आगमनामुळे घराघरांत आनंदाचे वातावरण होते. माहेरवाशीण असलेल्या महालक्ष्मी तथा गौराई अनेक घरांमध्ये पिढ्यान्पिढ्या बसविल्या जातात. काही घरांमध्ये नवसाच्या तर काहीजण हौस म्हणून गौराई बसवतात. पारंपरिक पद्धतीने वनस्पती घेऊन विहिरी, नदीकिनारी जाऊन या वनस्पतींची विधिवत पूजा करून गौराई आणली जाते. ग्रामीण भागात मोठा उत्सव पहायला मिळाला. शहरातील वैशयवाडा येथील म्हापसेकर यांच्या निवासस्थानी देखील गौराईचे आगमन झाले. राजवाड्याशी संबंधित काही घराण्यामध्ये रक्तवर्णी गणेशाची मूर्ती पूजण्याची प्रथा आहे. या घराण्यापैकी एक वैश्यवाडा भागातील म्हापसेकर घराणे असून सालाबादप्रमाणे म्हापसेकर परिवारानेही रक्तवर्णी श्री गणेशाची पूजा केली. तीन दिवसांच्या गौराईचे शुभागन ही झाले असून गौराईची मनमोहक मूर्तीही सजविण्यात आली आहे.