रेस्क्यू टीमचे मगरीला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न !

Edited by: विनायक गांवस
Published on: September 01, 2025 18:57 PM
views 55  views

सावंतवाडी : वनविभागाच्या जलद कृती दलाने मोती तलाव येथील मगरीला पकडण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. मात्र, मगरीन पाण्यात पळ काढल्यान हे रेस्क्यू ऑपरेशन अयशस्वी झाले. उद्या पुन्हा एकदा ही टीम मगरीला पकडण्याचा प्रयत्न करणार असून गणेश विसर्जनावेळी नागरिकांना पाण्यात उतरू नये, काळजी घ्यावी असे आवाहन रेस्क्यू टीमच्या बबन रेडकर यांनी केले आहे. 

उप वनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जलद कृती दलाने ही मोहीम राबवली होती. त्यापूर्वी नागरिकांनी रोष व्यक्त करत संताप व्यक्त केला होता. उप वनसंरक्षक यांचेही लक्ष वेधले होते. सायंकाळी उशीरा जलद कृती दलाचे बबन रेडकर, तुषार सावंत, शुभम सावंत, सिद्धेश नेमळेकर (सावंत) यांनी तलावात उतरत मगरीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या मगरीन पाण्यात पळ काढल्यान तीला जेरबंद करण्यात अपयश आले. 

यावेळी रेडकर म्हणाले, नैसर्गिक अधिवासात मगर आहे. त्यात पाणी भरल असून पिंजरा लावून देखील ती त्यात येत नाही. माणसाची चाहूल लागताच ती पळ काढते. आताही काही अंतरावर असताना तीने पळ काढला. माणसाला तसा धोका नाही. मात्र, नागरिकांनी पाण्यात उतरू नये, काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. पाण्याच प्रमाण वाढत असल्याने मोठ्या अडचणींना सामोर जाव लागत असल्याचे त्यांनी सांगितले.