
सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक मोती तलावात निदर्शनास येत असलेल्या मगरीला पकडण्यासाठी वनविभागाने 'सापळा ' लावला होता. मात्र, यात वनविभागाला यश आले नाही. त्यात रविवार नंतर आज पुन्हा एकदा या मारीन दर्शन दिलं. स्थानिकांनी वन विभागाच लक्ष वेधूनही वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी फिरकले देखील नाहीत. यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून दुर्घटनेनंतर वनविभागाला जाग येणार का ? असा सवाल केला जात आहे.
रविवारी तब्बल चार तास ही मगर संगीत कारंजावर येऊन बसली होती. मात्र, चार तासांत वनविभागाची टीम घटनास्थळी न पोहोचल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यात आजही पुन्हा या मगरीन दर्शन दिलं. दुपारपासून सायंकाळपर्यंत ती या ठिकाणी होती. यावेळी उपस्थितांनी उप वनसंरक्षक मिलीश शर्मा यांच लक्ष वेधलं. त्यांनी संबंधितांना तात्काळ उपाययोजना करण्यासही सांगितली. मात्र, तब्बल एक तास होऊन देखील मोती तलाव येथे वन विभागाचा एकही अधिकारी, कर्मचारी फिरकला सुद्धा नाही. यात सायंकाळी उशीरा कारंजावर असलेली ती मगर तलावात गेली.
नागरिकांच्या भीतीचा विषय ठरलेली ही मगर वनविभागाकडून लावण्यात आलेल्या सापळ्यात अडकेल अस वाटल होत. मात्र, वनविभाग केवळ दिखावूपणा करत असल्याचे यातून निदर्शनास येत आहे. दोन दिवसांत मगर दिसत असताना वन विभाग नेमका काय करत होता ? असा प्रश्न स्थानिकांनी केला आहे. गणेशोत्सव सुरू असून याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन होत आहे. त्यात ही मगर कारंजावर येऊन बसत असताना वन विभागात झोपेत आहे. उप वनसंरक्षकांचही लक्ष वेधून तासभर झाला तरी अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी फिरकत देखील नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर मोठी दुर्घटना घडल्यानंतरच वन विभाग जाग होणार का ? असा सवाल या निमित्ताने विचारला गेला आहे.