
सावंतवाडी : श्री हनुमान पुरूमारेश्वर घुमट आरती मंडळ, पीर्ण-गोवाने आपल्या सुमधुर घुमट आरतीने सावंतवाडीकरांना मंत्रमुग्ध केले. सद्गुरू ब्रम्ह मूर्ती दत्तात्रेय महाराज मंडळाच्यावतीने इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील श्री दत्त मंदिरात या खास घुमट आरतीचे आयोजन करण्यात आले होते.
श्रावण महिन्यातील शेवटच्या गुरुवारी आयोजित या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने सावंतवाडीकर उपस्थित होते. याप्रसंगी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनीही मंदिरात उपस्थित राहून दर्शन घेतले. गोव्यातील पारंपरिक वाद्यांचा वापर करत सादर केलेल्या या घुमट आरतीचे त्यांनी कौतुक केले. पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून जपलेली ही कला पाहून उपस्थितांनीही आनंद व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी या घुमट आरतीस उपस्थिती दर्शविली होती.