एका दीपस्तंभाला मुकलो

सावंतवाडीत दिवंगत विकास सावंत यांना श्रद्धांजली
Edited by: विनायक गांवस
Published on: July 21, 2025 20:17 PM
views 71  views

सावंतवाडी : काँग्रेस नेते आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कै. विकास सावंत यांच्या निधनाने सामाजिक, शैक्षणिक, आणि सहकार क्षेत्रातील एका दीपस्तंभाला आम्ही मुकलो, त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदान कधीही न पुसणारे राहील, अशा भावना आज येथे आयोजित श्रद्धांजली सभेत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने येथील आरपीडी शाळेच्या सभागृहात कै. विकास सावंत यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांनी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच विकास सावंत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी श्रद्धांजली वाहताना अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत म्हणाले, "सर्व सुखसोई व राजकारणातील सर्व प्लॅटफॉर्म उपलब्ध असताना ते राजकारणात संन्याशाचे जीवन जगले. मराठा मोर्चामध्ये त्यांचा मोठा सहभाग राहिला. मराठा समाजाच्या कामाबाबत त्यांनी आम्हाला एक रोडमॅप दिला होता. त्यांच्या रूपाने अभ्यासू नेता आम्ही गमावला. त्यांनी कुठल्याच क्षेत्रातील व्यक्तीबद्दल ईर्षा व्यक्त केली नाही. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील काम फक्त आरपीडीपुरते नव्हे, तर सर्वांसाठी होते. ॲड. संदीप निंबाळकर म्हणाले, "समाजाशी सातत्याने जोडले जाणारे, स्वतःहून काही घ्यायचे नाही या स्वभावगुणांचा विकासभाईंसारखा दुर्मिळ नेता होणे नाही. सावंतवाडी-दोडामार्गातील शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांचे हे काम असेच पुढे चालू ठेवूया." भोसले नॉलेज सिटीचे श्री. सावंत भोसले म्हणाले, "शैक्षणिक चळवळ चालवणे हे विकास सावंत यांच्या रूपाने शिकले पाहिजे. त्यांच्याकडे शैक्षणिक क्षेत्राबद्दल दूरदृष्टी होती. त्यांनी मार्गदर्शन करावे अशी आमची इच्छा होती, पण त्यांच्या अकाली एक्झिटने सर्वांच्याच जिव्हारी लागले आहे." अशोक दळवी म्हणाले, "कै. भाईसाहेब सावंत यांच्या राजकीय-शैक्षणिक वारसा जोपासण्याचे काम विकास सावंत यांनी चालू ठेवले होते. त्यात त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली. अनेक शैक्षणिक संस्था त्यांनी सुरु केल्या. राजकीय वाटचालीत त्यांचा अभ्यास दांडगा होता. त्यांच्या जाण्याने शैक्षणिक क्षेत्रातील उणीव कधीही न भरून येणारी आहे." ॲड. राघवेंद्र नार्वेकर म्हणाले, "विकास सावंत यांच्याकडे प्रचंड बौद्धिक क्षमता होती. याच जोरावर त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात सक्षम काम करू शकले. राजकारणात शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच ते राहिले, हे आजच्या राजकारण्यांसाठी शिकण्यासारखे आहे. जिल्हा बँक, जिल्हा परिषद अशा प्रशासकीय पातळीवरील त्यांचे काम सुद्धा अनेकांना लाजवेल असेच होते. त्यांच्या अकाली जाण्याने एक शैक्षणिक क्षेत्रातील हिरा आम्ही गमावला." श्री. बागवे म्हणाले, "विकासभाई सावंत यांचे मार्गदर्शन आम्हाला नेहमी राहील. खेडवळ गावातून मी सावंतवाडीत आलो, त्यांनी सातत्यपूर्ण प्रेरणा दिल्याने मी बांधकाम क्षेत्रात पाऊल टाकू शकलो.आरपीडी प्रशालेच्या प्रत्येक बांधकामावर त्यांनी प्रेम केले. त्यांच्या दूरदृष्टीतून त्यांनी आरपीडी प्रशालेचे सोने केले. वक्तृत्व, दातृत्व व कर्तृत्व त्यांच्याकडे प्रचंड होते. असे तेजस्वी व्यक्तिमत्व मी कधीच पाहिले नाही. यावेळी सुधीर पराडकर, विलास सावंत, शांताराम गावडे, मनोहर देसाई आदींनीही विकास सावंत यांना श्रद्धांजली वाहिली. या शोकसभेला अखिल भारतीय मराठा महासंघाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष अभिजीत सावंत, अखिल भारतीय मराठा महासंघाचे व्यापार-उद्योग जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, प्रमोद सावंत, प्रा. सतिश बागवे, डॉ. दिनेश नागवेकर, बाळासाहेब नंदीहळ्ळी, अमोल सावंत, सी.एल. नाईक, कौस्तुभ पेडणेकर, शैलेश नाईक, अशोक दळवी, बबन राणे, मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, सिंधुदुर्ग शेतकरी फळबागायतदार संघटनेचे विलास सावंत, संजय लाड, अभिजीत सावंत, माजी मुख्याध्यापक महासंघाचे शांताराम गावडे, रिक्षा संघटनेचे सुधीर पराडकर, संध्या चिटणीस, प्रसाद राऊत, मनोज घाटकर, आनंद नाईक, मनोहर देसाई, गोविंद सावंत, मेघश्याम काजरेकर, बाब्या म्हापसेकर, ॲड. राघवेंद्र नार्वेकर, सुधा राणे, शांताराम पारथी, मंथन गवस, संदीप राणे, आरपीडीच्या मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर आदी उपस्थित होते.