
सावंतवाडी : सिंधुदुर्गच्या विकासाचा दृष्टीकोन नजरेसमोर ठेवून ‘दै. कोकणसाद’ची वाटचाल सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुखपत्र म्हणून कोकणसाद पुढे येत आहे. या वृत्रपत्राची विश्वासार्हता आणि विकासाचा दृष्टीकोन वाखाणण्याजोगा आहे. सिंधुदुर्गातील तरुणांत एवढे टॅलेंट आहे, ते अशा कार्यक्रमांमधूनच कळते. एकंदरीत ‘युवा प्रेरणा’ या संकल्पनेतून कोकणसादने जिल्ह्यातील यशवंत तरुणाईचा केलेला गौरव जिल्ह्याच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, असे मत पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.
झाराप येथील हॉटेल आराध्य येथे ‘दै. कोकणसाद’चा ३६ वा वर्धापनदिन सोहळा थाटात पार पडला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमात होती. त्यांच्याच हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, दै. कोकणसादचे संपादक संदीप देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, ‘बीकेसी’चे संचालक अच्युत सावंत भोसले, उद्योजक आणि कुडाळ एमआयडीसीचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, उद्योजक डॉ. निलेश बाणावलीकर, दोडामार्गचे उद्योजक विवेकानंद नाईक, डॉ. मिलिंद कुलकर्णी, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, शिवसेना वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, माजी बांधकाम अभियंता अजयकुमार सर्वगोड, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, सरपंच सेवा संघटनेचे अध्यक्ष प्रवीण गवस, ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक, अभिमन्यू लोंढे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, राज्यात, देशात आता स्थीर सरकार आहे. त्यामुळे या तरुणांच्या देशात प्रत्येक तरुण विकासाचा केंद्रबिंदू आहे. विकासाच्या बाबतीत कोणतीही तडजोड होणार नाही. जगात ‘एआय’चा सध्या बोलबाला आहे. आणि देशात ही तंत्रप्रणाली राबविणारा सिंधुदुर्ग जिल्हा पहिला आहे. सिंधुदुर्गचा कित्ता आता गडचिरोलीने गिरविला आहे, आता त्या ठिकाणीही एआयचा वापर सुरू आहे. जिल्ह्यात अमली पदार्थांचा होत असलेला वापर चिंताजनक आहे. यात मी बारकाईने लक्ष घातला आहे. पोलिसांना कारवाईच्या सक्त सूचना दिल्या आहेत. पाच वर्षात अमली पदार्थाच्या विरोधात कारवाई करणार आहे. जिल्ह्यात अशा लोकांना थारा देणार नाही. छोट्या छोट्या विषयात मी लक्ष घालत आहे. पुढच्या वर्षापासून जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित होणार नाही. विद्युत खांब पडणार नाही, जिल्हावासियांना त्रास होणार नाही अशा उपाययोजना सुरु आहेत. कचऱ्याचे देखील नियोजन सुरु आहे. आडाळी एमआयडीसीमध्ये उद्योग येणार आहेत. कुठच्याच बाबतीत आपला जिल्हा कमी पडणार नाही. दोडामार्ग मध्ये हत्तींचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यावरही उपायोजना करण्याचे काम सुरु आहे. लवकरच हत्तींचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे, असे ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ‘दै. कोकणसाद’ने काढलेल्या ‘युवा प्रेरणा’ बदलाची सुरूवात या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविकपर भाषणात दै. कोकणसादचे संपादक संदीप देसाई म्हणाले, चार वर्षांत कोकणसादची घोडदौड सुरू आहे. नितेश राणे हेच युवकांची शक्ती आहेत. कौशल्याधिष्ठीत प्रशिक्षणातून रोजगारनिर्मिती करण्याकडे त्यांचा कल आहे. उद्योजक आणि बांबू चळवळीतून ज्यांनी कोकणातील बांबूला जगभरात प्रसिद्धी मिळवून दिली, ते मोहन होडावडेकर आजच्या युवकांसाठी आदर्श आहेत. त्यांनी अनेक युवा उद्योजक घडविले आहेत. यापुढेही दै. कोकणसाद युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि सिंधुदुर्गातील टॅलेंट जगासमोर आणण्यासाठी ही संकल्पना कायम सुरू ठेवणार असल्याचे देसाई म्हणाले.