चार दिवसात न. प.चं कॉक्रीट पाण्यात विरघळलं

अखेर सामाजिक बांधिलकीने खड्डा बुजवला
Edited by:
Published on: July 19, 2025 12:59 PM
views 325  views

सावंतवाडी : शहरातील नारायण मंदिर समोर मुख्य रस्त्यावर पडलेला खड्डा नागरिकांच्या रोषानंतर बुजवला होता. मात्र, चार दिवस सुद्धा न.प.चं कॉक्रीट टिकाव धरू शकल नाही. अपघातांना आमंत्रण देणारा हा खड्डा अखेर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी बुजवला आहे.

संस्थेचे अध्यक्ष  प्रा. सतीश बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली सात वर्ष 24 तास सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते येथील नागरिकांच्या सेवेसाठी सतर्क आहेत. श्रीराम वाचन मंदिर समोर मोती तलावाच्या काठी रस्त्याच्या मध्यभागी एक भला मोठा खड्डा पडला होता. अपघात होण्याची शक्यता होती. याचीच दखल घेऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून रहदारी व पाऊस कमी झाल्यावर  दोन वाजता सिमेंट काँक्रेटने खड्डा बुजवला. शाळकरी मुले व नागरिक रस्त्यावरून चालताना वाहनाचा टायर खड्ड्यांमधून जाऊन चिखलाचं पाणी त्यांच्या अंगावर उडत होते.

तसेच खड्डा अपघाताला कारण सुद्धा ठरत होता. याची दखल घेऊन संस्थेचे सदस्य रवी जाधव यांच्या पुढाकारातून खड्डा बुजवण्यात आला. यासाठी सिमेंट,वाळू व खडी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सचिव समीरा खलील यांनी पुरवली. तर संस्थेचे कार्यकर्ते लक्ष्मण कदम, सुजय सावंत, सुरज धुरी व रवी जाधव यांनी यासाठी योगदान दिले. याही अगोदर शहरातील कित्येक  धोकादायक खड्डे संस्थेच्या माध्यमातून बुजवण्यात आले होते. शहरातील बाजारपेठ व शाळा- महाविद्यालय परिसरातील सर्व खड्डे पावसाचा अंदाज घेऊन टप्प्याटप्प्याने बुजवण्याचा निर्धार येथील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने केला आहे असे श्री. जाधव यांनी सांगितले.