जिल्ह्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव

केसरकरांचे साईबाबांचरणी साकडे
Edited by: विनायक गांवस
Published on: July 19, 2025 11:57 AM
views 229  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण होऊ दे.कोकणातील प्रत्येक घरात आर्थिक समृद्धी निर्माण होवो आणि हा जिल्हा सुजलाम् सुफलाम् होऊ दे, यासाठी आम्हा सर्वांना बळ दे असे साकडे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शिर्डी येथील साईबाबांचरणी तसेच मुंबई येथील सिद्धिविनायक व महालक्ष्मी मंदिरात घातले. 

केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून त्यांना राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील उद्योजक, मित्रमंडळींनी शुभेच्छा दिल्या. केसरकर यांनी मुंबईत सकाळी सिद्धिविनायक व महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर शिर्डी साईबाबा मंदिरात दर्शन घेत आपला वाढदिवस आध्यात्मिक वातावरणात साजरा केला.

सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले या तिन्ही तालुक्यात शिवसैनिक तसेच मित्रमंडळी यांनी विविध संस्था, शाळांमध्ये तसेच गोरगरीब मुलांना आर्थिक मदतीचा हात देऊन सामाजिक उपक्रमाद्वारे वाढदिवस साजरा केला. सावंतवाडी येथे श्रीधर अपार्टमेंट निवासस्थानी अनेक शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.