यश मिळाल्यानंतर पाय जमिनीवर ठेवून प्रवास करा : कल्पना बांदेकर

Edited by: विनायक गांवस
Published on: July 18, 2025 20:27 PM
views 23  views

सावंतवाडी : लहानपणापासून मुलांना आई-वडील आणि त्यानंतर ज्ञान देणारा व्यक्ती हा गुरूच्या स्वरुपात भेटतो. त्यामुळे आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा सदुपयोग करुन यशस्वी होण्याकडे वाटचाल करावी, कठोर परिश्रम केल्यानंतर यश नक्कीच मिळते. मात्र, यश मिळाल्यानंतर पाय जमिनीवर ठेवून पुढील प्रवास करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका कल्पना बांदेकर यांनी केले. सावंतवाडी येथे विश्व डान्स ॲकॅडमीच्या माध्यमातून गुरुपौर्णिमा निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 

यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, डान्स अ‍ॅकेडमीचे संचालक तुळशीदास आर्लेकर, शितल आर्लेकर,युवा पत्रकार भुवन नाईक, कौस्तुभ मुंडये, मिहीरा सूर्यवंशी, जेसिंता गोम्स, तृप्ती सुभेदार, श्रुती गिरप, मयुरी माडकर, समृद्धी जाधव आदी उपस्थित होते. यावेळी बांदेकर पुढे म्हणाल्या, मार्ग दाखविण्याचे काम गुरु करतो. मात्र, कठोर परिश्रम करुन स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्याची जबाबदारी आपलीच असते. त्यामुळे मुलांनी आपल्या अंगात असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी कठारे परिश्रम करावेत असे ही त्या म्हणाल्या. यावेळी श्री. टेंबकर म्हणाले, आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जगात यशस्वी होण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नाही.

तर सातत्यपूर्ण कठोर परिश्रम आणि कौशल्यांचा विकास आवश्यक आहे. गुरु किंवा शिक्षक हे आपल्याला ज्ञानाचा मार्ग दाखवतात, योग्य दिशा देतात. परंतु, त्या मार्गावर चालून आपले ध्येय गाठण्याची आणि स्पर्धेत टिकून राहण्याची खरी जबाबदारी ही विद्यार्थ्यांचीच असते. आजच्या युगात केवळ चांगले गुण मिळवून चालणार नाही. तर आपले व्यक्तिमत्व सर्वांगीण विकसित करणे गरजेचे आहे. यासाठी अभ्यासक्रमापलीकडील गोष्टींमध्येही विद्यार्थ्यांनी रस घेऊन त्यात प्राविण्य मिळवावे. यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनीही मुलांना योग्य प्रोत्साहन द्यावे. यावेळी  विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती सादर केले त्याला उपस्थित पालकांनी दाद दिली