
सावंतवाडी : मळगाव येथील श्री भगवती हॉल येथे न्हावेली येथील गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेच्या 'गुरु अभिवादन सोहळा-२०२५' चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गुरु पूजनासहीत संस्थेतील विद्यार्थ्यांचे गायन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेतील पदाधिकारी व विद्यार्थ्यांच्यावतीने या गुरु अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अभिवादन सोहळ्याचे यंदाचे हे १२ वे वर्ष आहे. या गुरु अभिवादन सोहळ्याचे उदघाटन २० जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उदघाटक जिल्हाधिकारी अनिल पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून उप जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी शेवाळे, तळवणे मठाधिपती तथा सावंतवाडी संस्थान राजगुरु राजेंद्रस्वामी भारती महाराज, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या संपूर्णा गुंडेवाडी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या उदघाटनानंतर सकाळी १०.०० वाजता गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी 'जय जगदीश हरे प्रार्थना, सकाळी १०.१५ वाजता संगीत अलंकार गुरुवर्य श्री दिप्तेश मेस्त्री यांचे सुश्राव्य गायन, ११ ते १.३० वाजता गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचे सुश्राव्य गायन, १.३० ते २.३० वाजता भोजन, २.३० ते ४.०० वाजता विद्यार्थ्यांचे सुश्राव्य गायन, सायंकाळी ४.०० वाजता मुख्य कार्यक्रम गुरुपूजन सोहळा, ५.३० वाजता विद्यालयातील ज्येष्ठ विद्यार्थ्यांचे भैरवी गायन आणि कार्यक्रमाची सांगता होणार आहे. हितचिंतकांनी तसेच संस्थेतील विद्यार्थ्यांनी सहकुटुंब सहपरिवार कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन गुरुकुल शिक्षण संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.