सावंतवाडीत अजूनही पाण्याचा तुटवडा : बबन साळगावकर

Edited by: विनायक गांवस
Published on: July 11, 2025 19:34 PM
views 19  views

सावंतवाडी : शहरामध्ये पावसाळ्यातही काही भागांमध्ये अजून पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागामधील हा सावळा गोंधळ गंभीर बाब असून सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी याबाबत रोष व्यक्त केला आहे. नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये सक्षम वॉटर सप्लाय इंजिनियर नसल्यामुळे शहरातील नागरिकांना पावसाळ्यातही पाणी मिळत नाही. पाणी मिळत नसल्यामुळे व पाण्याच्या अनियमिततेमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून नागरिक त्रस्त झाले आहेत. नगरपरिषद प्रशासन अधिकाऱ्यांनी याबाबत स्वतः लक्ष घालून कर्मचाऱ्यांच्या मनमानीला आळा घालावा असे श्री. साळगावकर म्हणाले.

गेला महिनाभर शहरात पाण्याची समस्या जाणवत असून नागरिक हैराण झाले आहेत. परंतु हे नगर परिषदेचे सुशेगात अधिकारी आणि कर्मचारी या पाणी समस्येकडे ढुंकूनही पाहत नाहीत. गेले कित्येक महिने सावंतवाडी नगरपरिषदेत मुख्याधिकारी नाहीत. प्रभारी मुख्याधिकारी चेक वरती सह्या करण्यापूर्वी येतात. नगरपरिषदेच्या समस्या जाणून घेणे व त्याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना देणे ही प्रशासकांची जबाबदारी नाही का? चेकवर सह्या झाल्यानंतर प्रशासकी जबाबदारी संपते काय? प्रशासकांनी याची उत्तर देऊन दोन दिवसांत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा प्रशासकांना नागरिकांच्या गंभीर रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा  बबन साळगावकर यांनी सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनाला आहे.