
सावंतवाडी : शहरामध्ये बुधवारी रात्री अज्ञात चोरट्याने धुडघुस घालत चोरीचा प्रयत्न केला. गोवा कळंगुट येथील टॅक्सी चालकावर पेडणे मालपे येथे प्राणघातक हल्ला करत या चोरट्याने तीच टॅक्सी घेऊन सावंतवाडीच्या दिशेने पलायन केले होते. यानंतर सावंतवाडीत त्यांनी घरफोडी, दोन मोबाईल व दोन दुचाकी अशा चोरी करत कणकवलीच्या दिशेने पलायन केले. एकूणच या चोरांना पकडण्यासाठी गोवा व सावंतवाडी पोलिसांनी शहरामध्ये शोध मोहीम राबवली. मात्र, चोरट्यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून जाण्यात यश मिळवले. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात घरपोडी आणि मोटरसायकल चोरी व मोबाईल चोरी असे तिन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत सावंतवाडी शहरांमध्ये गोवा आणि सावंतवाडी पोलिसांनी संयुक्तपणे शोध मोहीम राबवली. यामध्ये गोवा पोलिसांच्या तब्बल सहा पोलीस व्हॅन सावंतवाडीत दाखल झाल्या होत्या. विविध परिसरामध्ये या चोरट्यांचा शोध घेण्यात आला. मात्र, पोलिसांना गुंगारा देण्यात त्या चोरट्यांना यश आले. आज सकाळी संबंधित चोरट्याने चोरलेली एक दुचाकी कणकवली सावडाव येथे आढळून आली असून दुसर्या दुचाकीचा शोध अद्याप सुरू आहे. दरम्यान, घटनेनंतर सायंकाळी उशिरा अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी करत चोरीबाबत पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याकडून माहिती घेतली. चोरीचा छडा लावण्याबाबत पोलिसांना सूचना केल्यात. या प्रकरणी पोलिसांकडे तीन चोरीचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.