
सावंतवाडी : माडखोल गावात होणाऱ्या वारंवार निर्माण होणाऱ्या वीज समस्यांप्रश्नी ग्रामस्थांनी महावितरणला धडक देत उप कार्यकारी अभियंतांना जाब विचारला. यावर उपाययोजना न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला.
विजेचा लपंडाव, डिम लाईट ,दिवसातून पाच ते दहा वेळा लाईट जाणे, रात्री अपरात्री लाईट जाणे या सर्व गोष्टीला कंटाळून आज मडखोल गाव विकास संघटनेन सावंतवाडी वीज अभियंता श्री. राक्षे यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला. यावेळी राक्षे यांनी तात्काळ मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. वायरमन संतोष राऊळ यांना आजपासून माडखोल गावात हजर करतो तसेच विजेच्या होणाऱ्या समस्या चार दिवसात पूर्णपणे क्लिअर करून देतो. लाईटचा प्रश्न आजपासून आपल्याला तेवढा त्रासदाय होणार नाही याची खात्री देतो असे आश्वासन दिले.
यावेळी संतापलेल्या ग्रामस्थांनी आपण दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आपण काम न केल्यास आम्ही येणाऱ्या चार दिवसानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या आगाऊ सूचना न देता आपल्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू असे सांगितले. यावेळी माडखोल गाव विकास संघटना अध्यक्ष दत्ताराम राऊळ, भाजपाचे युवा नेतृत्व संदीप गावडे, माडखोल उपसरपंच जीजी राऊळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजकुमार राऊळ, ग्रामपंचायत सदस्य विजय राऊळ, सामाजिक कार्यकर्ते अमित राऊळ , शैलेश माडखोलकर, बंटी सावंत, नागेश मेस्त्री आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.