
सावंतवाडी : माठेवाडा येथे राहणाऱ्या सौ. प्रिया पराग चव्हाण (वय ३३) या विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिची नणंद, देवगडच्या नगरसेविका प्रणाली मिलिंद माने (वय ४२) आणि त्यांचा कॉलेजवयीन मुलगा यांच्याविरोधात रविवारी रात्री सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सावंतवाडी पोलीस पथक तपासणीसाठी देवगडला रवाना झाले. मात्र, संशयीत अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. मयत प्रिया चव्हाण यांनी ओढणीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर प्रियाचे वडील विलास तावडे यांनी रविवारी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आपल्या मुलीच्या आत्महत्येची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आणि महिला पोलीस अधिकारी सौ. माधुरी मुळीक यांनी या प्रकरणाचा तपास केला. प्रियाच्या आई-वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद केले की, संशयित नणंद प्रणाली माने आणि तिच्या मुलाने प्रियाचा मानसिक छळ केला होता. ज्यामुळे ती प्रचंड दबावाखाली होती. त्यांच्या जबाबावरून, मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सौ. माधुरी मुळीक करत आहेत.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील आणि त्यांचे पथक चौकशीसाठी देवगड येथे पोहोचले होते. त्यांनी गुन्हा दाखल झालेल्या सौ. प्रणाली आणि तिचा मुलगा आर्यन मिलिंद माने यांचा शोध घेतला. तसेच या प्रकरणी अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. दरम्यान, मयत प्रिया चव्हाण यांचा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात असून संशयितांचे मोबाईल मिळवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. तसेच या प्रकरणी आणखी काही पुरावे मिळतात का ? याचीही चाचपणी पोलीस करत आहेत.