भाजप आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात ख्रिस्ती समाजाची कारवाईची मागणी

Edited by: विनायक गावंस
Published on: July 07, 2025 19:52 PM
views 76  views

सावंतवाडी : आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती समाजाबद्दल केलेल्या कथित वादग्रस्त विधानावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॅथोलिक समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या विधानांबद्दल पडळकरांवर कायदेशीर कारवाई करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी  जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोमन कॅथोलिक समाज अनेक शतकांपासून इतर समाजांसोबत सलोख्याने आणि शांततेने राहत आहे. समाजात शांतता व सलोखा राखणे हेच त्यांचे उद्दिष्ट राहिले आहे. मात्र, आमदार गोपीचंद पडळकर हे ख्रिस्ती समाजाविरोधात सातत्याने वादग्रस्त विधाने करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. ही विधाने समाजात गैरसमज आणि द्वेष वाढवणारी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 आम्ही कोणत्याही प्रकारच्या धर्मांतराचे समर्थन करत नाहीत किंवा तसे कोणतेही कार्य करत नाहीत. समाजाचे धर्मगुरू फादर देखील धर्मांतरास प्रोत्साहन देत नाहीत. त्यांच्या सर्व प्रार्थना आणि धार्मिक विधी केवळ नोंदणीकृत चर्चमध्येच आयोजित केले जातात. सार्वजनिक ठिकाणी किंवा बाहेरील ठिकाणी असे विधी होत नाहीत. असे असतानाही आमदार पडळकर यांनी समाजाबद्दल आणि फादरबद्दल अत्यंत वादग्रस्त आणि बदनामीकारक विधाने केली आहेत. या विधानांमुळे सोशल मीडियाद्वारे समाजात चुकीची माहिती पसरवली जात असून त्यामुळे सामान्य लोकांचा त्यांच्या समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक बनत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. एक लोकप्रतिनिधी आणि आमदार म्हणून पडळकर यांनी केलेली विधाने अत्यंत बेजबाबदार आणि समाजाला दिशाभूल करणारी असून  त्यांच्या या कृत्यामुळे सामाजिक सलोख्याला बाधा येत असल्याचे ख्रिस्ती बांधवांचे म्हणणे आहे.

या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, तसेच लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेल्या विधानांसाठी त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, आम.पडळकर यांनी समस्त रोमन कॅथोलिक समाजाची माफी मागावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. याप्रसंगी व्हिक्टर डॉन्टस, अनारोजीन लोबो, ग्रेगरी डॉन्टस, लॉरेन्स मान्येकर, मायकल डिसोझा, आगोस्तिन फर्नांडिस, व्हिक्टर फर्नांडिस आदिंसह ख्रिस्ती समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.