मोहरम निमित्त मुस्लीम बांधवांची ताबूत फेरी

हसेन-हुसैन बलिदानाचा जागर
Edited by: विनायक गावंस
Published on: July 06, 2025 22:23 PM
views 68  views

सावंतवाडी : शहरात मोहरम निमित्त मुस्लिम बांधवांकडून ताबूत फेरी काढण्यात आली. याच मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसैन हे दोघेही करबला येथे शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुस्लिम बांधव या दिवशी शोक व्यक्त करतात. शहरात ७ ठिकाणी पीर उत्सव होतो. रात्री मोती तलाव येथे ताबूत विसर्जन करण्यात आले. 

मोहरमपासून हिजरी संवत सुरू होते. हिजरी संवतचा हा पहिला महिना असतो. हजरत मोहम्मद पैगंबर यांची मुलगी बीबी फातिमा यांची हसेन आणि हुसेन ही दोन्ही मुले होती. पैगंबरांचे हे दोन्ही नातू करबला येथे शहीद झाले. इराकची राजधानी असलेल्या बगदादमधील करबला या गावात 'तारीख-ए-इस्लाम' हे ऐतिहासिक युद्ध झाले होते. मोहरम हा दु:खाचा दिवस आहे. या दिवशी हसेन आणि हुसैन यांचे बलिदान उजागर केल जात. शिया समुदायातील लोक १० दिवस काळे कपडे घालतात. या बलिदानासाठी जुलूस काढला जातो. मोहरम निमित्त सावंतवाडी शहरात सायंकाळी ताबूत फेरी काढण्यात आली. रात्री उशीरा या पिरांच विसर्जन करण्यात आलं. 

मोहरममधून सामाजिक ऐक्य जपण्याच काम केल जात. शहरात 7 ठिकाणी हा उत्सव होतो. सालईवाडा येथे संस्थानकालीन मराठा सरदार घराण्याच्या नावानं असलेला 'निंबाळकर पीर' एकात्मतेच प्रतिक मानला जातो. उभाबाजार येथे रात्री उशिरा सरदार निंबाळकर पीर, जलाल शहा पीर, तहसीलदार पीर, सय्यद पीर, म्हाताचे पीर, पटवीचे पीर, काझीचे पीर एकमेकांना भेटले. हिंदू बांधवांकडून देखील पीराला ठिकठिकाणी गुळाचा नैवेद्य दाखवला गेला. ‘मराठ्यांचा पीर’ अशी ओळख असलेला निंबाळकर पीर विसर्जनाला जात असताना कळसुलकर हायस्कूल येथील भवानी देवीच्या भेटीला गेला. यावेळी हिंदू बांधवांनी मुस्लीम बांधवाच्या पायावर पाणी घालत, नैवैद्य अर्पण करत परंपरा जपली. मुस्लिम बांधवांकडून भवानी देवीला साकडे घालण्यात आले. पूर्वी भवानी मंदिरात पीराच्या पतवा ठेवल्या जात असत. त्यामुळे त्याठिकाणी भवानी देवीला भेटण्याची प्रथा आहे. हिंदू-मुस्लिम सामाजिक ऐक्य यानिमित्ताने जपलं गेलं. एकीकडे आषाढी एकादशी व दुसरीकडे ताबूत विसर्जन असे दोन मोठे सण असल्याने पोलिसांनी देखील कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.