
सावंतवाडी : तालुक्यातील मळेवाड-कोंडुरे देऊळवाडी येथील प्रभाकर मुळीक या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. एकूण चार जण यात जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे
मळेवाड येथील प्रभाकर मुळीक यांच्या घरा मागे कुत्रा व मांजराला आपला भक्ष करण्यासाठी बिबट्या आला होता. मुळीक यांना घराच्या मागच्या बाजूला कोणाचीतरी चाहूल लागल्याने त्यांनी दरवाजा उघडला असता त्यांच्यासमोरच बिबट्या दिसला. यावेळी बिबट्याने मुळीक यांच्यावर हल्ला चढवत डोक्यावर पंजा मारला. यात त्यांना गंभीर जखमी दुखापत झाली. मुळीक यांनी आरडाओरडा करताच बिबट्याने पलायन केले. यानंतर जखमी मुळीक यांना उपचारासाठी मळेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. ही घटना घडली असताना लगेचच अर्ध्या तासाच्या अंतरात देऊळवाडी येथील सावंत यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवत त्यांना ओढून नेण्याचा प्रयत्न केला.
मात्र, ग्रामस्थांनी त्यांना बिबट्याच्या तावडीतून सोडवले. यावेळी त्या ग्रामस्थांमधील पंढरी आजगावकर यांच्यावर बिबट्याने हल्ला करत त्यांना जखमी केले. या घटनेची माहिती वनविभागला देण्यात आली आहे. दिवसाढवळ्या भरवस्तीत येऊन बिबट्याने हल्ला केल्याने या परिसरात भीतीचे वातावरण आहे. मुळीक यांच्या घरा मागील बागेत चारही बाजूला पावसाचे पाणी साचले असल्याने बिबट्यास पाण्यातून बागेबाहेर जाणं कठीण असल्याने तो बागेतच असावा असा अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी वर्तवला आहे. वनविभागने बिबट्याला जेर बंद करावे अशी मागणी केली जात आहे.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. याबाबत सावंतवाडी वनविभागाचे वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी दुजोरा दिला आहे.