LIVE UPDATES

सरकारला नेमके किती बळी हवेत ?

दैव बलवत्तर म्हणून शेतकरी बचावला ; इन्सुलीत पॉवर टिलरवर पडली वीजवाहिनी
Edited by: विनायक गावंस
Published on: July 06, 2025 15:42 PM
views 120  views

सावंतवाडी : महावितरणच्या दुर्लक्षामुळे अन् गलथान कारभारामुळे आज एका शेतकऱ्याला जीव गमवावा लागला असता. दैव बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला. या घटनेत इन्सुली गावातील शैलेश कोठावळे हे शेतकरी आज थोडक्यात बचावले. 

इन्सुली बिलेवाडी शाळा क्र. ७ जवळ श्री. कोठावळे शेतात काम करत असताना अचानक विद्यूत भारीत वाहिनी त्यांच्या पॉवर टिलरवर कोसळली. सुदैवाने शैलेश कोठावळे यातून बचावले.ते स्वतः इलेक्ट्रिशियन असल्याने त्यांनी समयसूचकता राखली. या घटनेमुळे गावातील जीर्ण झालेल्या वीजवाहक तारा आणि खांबांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. इन्सुली गावातील ग्रामस्थांनी यापूर्वीही याबाबत प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. ग्रामस्थांनी आता प्रशासनाला १५ ऑगस्टपर्यंत जीर्ण कंडक्टर आणि खांब न बदलल्यास, आपल्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शेतातून जाणाऱ्या वीजवाहक तारांबाबत शेतकऱ्यांनी अधिक सावधगिरी बाळगावी असे आवाहनही करण्यात आले आहे. आपल्या शेतातून वीजवाहक तारा गेल्या असल्यास अधिक सावधगिरी बाळगा, धोका टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्या असं आवाहन ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर यांनी केल आहे.

सरकार अजून किती बळी घेणार ?*

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे उर्जा खात आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे यांनी यासंदर्भात वारंवार लक्ष वेधलं आहे. आमदार निलेश राणे यांनी नुकताच पावसाळी अधिवेशनात लोकांचे जाणारे प्राण बघता सरकारला चांगलच धारेवर देखील धरलं. इथल्या लोकांच दुःख त्यांनी पोटतिडकीने मांडलं.  त्यामुळे आता राज्य सरकार कोकणी माणसाचे, मुक्या जनावरांचे आणखीन किती बळी घेणार असा सवाल कोकणवासीय विचारत आहेत.